यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा चांगलाच वादात अडकला होता. कारण राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याने जवळपास ६०हून अधिक विजेत्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र या विजेत्यांना अजूनही त्यांचा पुरस्कार मिळाला नसून मानचिन्ह आणि प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत ते आहेत.

६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फक्त ११ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर इतरांना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावरूनच बऱ्याच कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.

‘लडाखी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे प्रवीण मोरछाले हेदेखील सोहळ्याला अनुपस्थित होते. आता महिना उलटूनही पुरस्कार मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘जे इतर विजेते सोहळ्याला अनुपस्थित होते, त्यांच्या मी सतत संपर्कात आहे. त्यापैकी काहींनी पुरस्कार सोहळ्याशी निगडीत कार्यकारिणीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तर त्या पुरस्कार वितरणांसंदर्भात मंत्रालयाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याची अनौपचारिक माहिती त्यांनी दिली. हे पुरस्कार कुरिअर करावेत की प्रादेशिक कार्यालयातून ते विजेत्यांनी घ्यावेत किंवा दिल्लीला प्रतिनिधीला पाठवून ते मिळवावे यासंदर्भात कोणताच निर्णय मंत्रालयाकडून घेण्यात आला नाही. ३ मे पासून कोणताच संपर्क त्यांनी या विजेत्यांशी साधला नाही.’

दुसरीकडे येत्या काही दिवसांत हा पुरस्कार त्या त्या विजेत्यांना मिळेल अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा पार पडून महिना उलटला तरीही अद्याप संभ्रम कायम असल्याचं दिसून येत आहे.