६५ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सत्र पहिले

सवाई गंधर्व महोत्सवाचे हे ६५ वे वर्ष; वारकरी जसा वर्षभराच्या व्यग्र दिनचर्येमधून आषाढात वेळ काढून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातो. तद्वतच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर अपार प्रेम करणारी जगभरातील रसिक मंडळी पाऊले चालती..। या काव्योक्तीनुसार या स्वरदरबारात येण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. गर्दीचा उच्चांक हा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही महोत्सवाला मिळालेली पावतीच आहे.

पं. मधुकर धुमाळ या ज्येष्ठ शहनाईवादक यांनी ‘भीमपलास’मधील विलंबित व द्रुत लयीतील गतीने, मंगल सुरांनी प्रारंभ केला. आलाप प्रधान, विलंबित व द्रुत त्रितालातील तंतकारीने श्रोत्यांची मने जिंकली. कजरी धून नजाकतीने सादर करून वादन थांबविले.  भरत कामत यांनी तबला साथ केली.

पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य डॉ. विजय राजपूत यांनी ‘पूरिया कल्याण’ हा राग सादरीकरणासाठी निवडला. ‘आज सो बन।’ ही पं. जोशी यांची सुप्रसिद्ध बंदिश सादर केली. विलंबित एकतालात आलापांनी युक्त रागविस्तार अपेक्षित होता, पण फारच थोडा वेळ आलापांना दिला गेला. तानासाठी दमसास मात्र उत्तम होता. गमकेच्या जबडा ताना, सुरेख जमल्या. द्रुत त्रितालातील ‘बहुत दिन बीते’ ही बंदिश सादर केल्यानंतर ‘होरी’ हा उपशास्त्रीय गीत प्रकार ‘पिलू’ रागात दादरा तालात सादर केला. तसेच रघुवर तुमको मेरी लाज। हे भजन सादर केले.

पं. देबाशिष भट्टाचार्य यांचे चतुरंगी वादन झाले. हे वाद्य त्यांची स्वत:ची निर्मिती आहे. गिटार या वाद्यात त्यांनी आमूलाग्र बदल करून या वाद्यातून अनेक तंतुवाद्यांचा आविष्कार करता येतो असे त्यांनी सांगितले. त्यांनी राग ‘मधुवंती’मधील गत सादर केली. संथ आलापी सुरू झाली. नंतर झपतालात मिंड घसीट, सूंथ अतिशय सुरेख जमली. आत्मविश्वास व सृजनशीलता लाभलेल्या या कलाकाराची प्रत्येक वेळी वेगळ्या स्वरांपासूनची उपज कौतुकास पात्र होती. ताल अंगाने चाललेला जमजमा, स्वरांची कंपने या मधुवंतीची आंतरिक भावावस्था दाखवित होती. त्याने हा स्वरदरबार भावविभोर झाला. शेवटी ‘बाजे रे मुरलीया। हे पं. भीमसेनजी व लता मंगेशकर यांचे भक्तिगीत सादर करून वादन थांबविले.

पं. राजन व पं. साजन मिश्रा यांचे गायन झाले. त्यांना पं. अरिवद थत्ते यांनी स्वरसंवादिनीची, शांतिलाल शहा यांनी तबल्याची साथसंगत केली. ‘पूरिया’ राग त्यांनी निवडला.

विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल होते ‘थोरे थोरे दिननकी।’ ‘मारवा’ थाटातला षाडव जातीचा हा पूर्वागप्रधान राग खूपच ताकदीने सादर केला. अत्यंत शांतपणे एक एक स्वरांचे मागील पुढील स्वरांशी असलेले नाते उलगडत चाललेली बढत, गायनामधील रंगत वाढवित होती. बोल आलापानंतर तर्कसंगत, सरगम छान जमले. दोघांमध्ये सुरेख असे साहचर्य आहे. दोघे गात असूनही एकाच गायकाचे गायन चालू आहे असे वाटते. स्थायी वर्णाच्या अवरोही वर्णाच्या ताना सायंकालीन येणारी हुरहूर त्यांनी खूपच समर्पकपणे स्वरमाध्यमामधून मांडली. द्रुत त्रितालात ‘मै तो घर आयी पिया संग।’ ही पारंपरिक बंदिश अविस्मरणीय झाली. याच रागातील ‘पिया संग लागी।’ ही द्रुत एकतालातील बंदिश खटक्याच्या तानांनी तसेच अतितार सप्तकाच्या षडजाला स्पर्श करणाऱ्या ताना अविस्मरणीय होत्या. यानंतर हेच स्वर असलेला ‘सोहोनी’ हा षाडव जातीचा राग मध्य त्रितालात सादर केला. बोल होते ‘‘आयी री ऋतु।’’ शेवटी ‘जगत मे झुठी प्रीत।’ हे भजन सादर केले.

बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी या स्वरसोहळ्याचे अंतिम पुष्प गुंफले. ‘बिहाग’ रागामधील गत त्यांनी आलाप जोड झाला या गानक्रमाने सादर केली. अनिबद्ध आलापांनी या गतीचा आकृतीबंध दाखविला. सुरेल असे बासरीवादन होते. हरिजींचा शिष्य परिवार सौरभ वर्तक आणि देबोप्रिया यांनी सुरेख साथ केली. मत्त तालात याच रागातील गत माधुर्याने भरलेली होती.

सामूहिक वेणुवादन हे कायमच गोप-गोपींच्या मेळ्यात आपल्याला घेऊन जात असते. त्याचा अनुभव रसिकांना आला. अनेक आवर्तनात अनाघाताने सम दाखवून मोठी दाद घेऊन गेले. पखावज साथीला पं. भवानी शंकर, तर तबला साथ पं. विजय घाटे यांची होती.

(लेखक संगीत समीक्षक आणि बासरीवादक आहेत.)