बॉलिवूड विश्वात निर्माता दिग्दर्शक करण जोहर म्हणजे एक प्रस्थच जणू. अभिनय, निर्मिती म्हणू नका किंवा मग दिग्दर्शन. प्रत्येक क्षेत्रात करणने अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत आपली वेगळी ओळख या कलाविश्वात प्रस्थापित केली. काही तरुण कलाकारांनाही या इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी करणने त्यांच्या करिअरला हातभार लावला. अशा या सेलिब्रिटींच्या लाडक्या ‘केजो’ म्हणजेच करण जोहरचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने कलाकारमंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

करणचं आयुष्य म्हणजे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. मग ते त्याचं खासगी आयुष्य असो किंवा मग व्यावसायिक आयुष्यात घराणेशाहीचा प्रणेता म्हणून असणारी त्याची ओळख असो. प्रत्येक गोष्टीला आपलंसं करणाऱ्या या करणविषयी आणखीही अशा काही गोष्टी आहेत, ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया करणच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टींबद्दल…

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

करणचं प्रभावी संवादकौशल्य आणि फ्रेंच भाषेवर असणारं प्रभुत्त्व…
करणचं संवादकौशल्य अनेकांची मनं जिंकतं. पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनापासून ते अगदी ‘कॉफी विथ करण’मध्ये मारलेल्या गप्पांपर्यंत प्रत्येकवेळी करणच्या संवादकौशल्याने सर्वांचं लक्ष वेधलं. फ्रेंच भाषेमध्ये त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून, त्याचाच फायदा त्याचा इतरही मार्गांनी होत असल्याचं इथे स्पष्ट होतं.

‘के’ किंवा ‘क’ या एका अक्षराविषयीची आत्मियता..
‘के’ किंवा ‘क’ या एका अक्षराविषयी करणला बरीच आत्मियता आहे. काही गोष्टींवर अंधविश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक म्हणजे करण जोहर. चित्रपटांच्या नावांमध्येही त्याचं हे ‘के’प्रेम वारंवार दिसून आलं. पण, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र त्यांने आपली ही भूमिका बदलली.

ते अपूर्ण स्वप्न…
अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या करणची एक इच्छा अद्यापही अपूर्ण आहे. ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालण्याची, त्या व्यासपीठावर ऑस्कर जिंकून इंडिया धिस इज फॉर यू असं म्हणण्याची आपली इच्छा त्याने व्यक्त केली होती. किंबहुना या स्वप्नाचा त्याने सरावही केला आहे.

ई-मेलचं उत्तर देणं करणची सर्वात नावडती गोष्ट
ई-मेल हे अनेकदा काही अधिकृत व्यवहारांसाठी वापरलं जाणारं विश्वासार्ह माध्यम आहे. पण, हे माध्यम वापरणं करणला काही आवडत नाही. त्याच्या अर्ध्याहून अधिक ई- मेलचं उत्तर देण्याचं काम हे त्याच्या सेक्रेटरींचं असतं. तर अधिकच महत्त्वाच्या व्यक्तीचा ई-मेल असल्यास तो मेलवरुन त्याचं उत्तर देण्याऐवजी थेट त्या व्यक्तीशी फोनच्या माध्यमातून संवाद साधतो.

शाहरुख नव्हे तर हृतिक आहे करणचा आवडता अभिनेता
शाहरुख खान आणि हृतिक रोशन हे समीकरण अनेकांच्याच आवडीचं आहे. किंबहुना या जोडीच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. शाहरुख आणि करणमध्ये असणारी मैत्री आणि त्यांच्यातील घरोबा पाहता, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीसुद्धा हे दोघं एकमेकांडून सल्ले घेत असल्याचं स्पष्टं होतं. असं असलं तरीही शाहरुख करणचा सर्वाधिक आवडीचा अभिनेता नाही. हे खुद्द करणच्याच एका वक्तव्यातून स्पष्ट झालं होतं.