24 November 2017

News Flash

किशोर कुमार यांची आज ८४वी जयंती

गायक-अभिनेता-दिग्दर्शक-संगीतकार किशोर कुमार यांची आज (रविवार) ८४वी जयंती आहे.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 4, 2013 2:53 AM

गायक-अभिनेता-दिग्दर्शक-संगीतकार किशोर कुमार यांची आज (रविवार) ८४वी जयंती आहे. त्यांनी आवाज आणि अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये १९४६-१९८७ सालापर्यंत राज्य केले. गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या जयंतीनिमित्त ट्विट केले आहे.
किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे मुळ नाव आभास कुमार, पण बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी नाव बदलून चित्रपट कारकिर्दिला सुरुवात केली. अभिनेता म्हणून त्यांनी १९४६ साली ‘शिकारी’ हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. ‘चलती का नाम गाडी’, ‘पडोसन’, ‘दिल्लीका ठग’, ‘नई दिल्ली’, ‘झुमरू’, ‘आशा’, ‘हाफ़ टिकट’, ‘श्रीमान’ ‘फ़न्टूश’ हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट आहेत. आपल्या भावाच्या मदतीने अभिनेता म्हणून बरीच कामे त्यावेळी किशोर कुमार यांना मिळत गेली. पण, त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते.
१९४८ साली त्यांनी ‘जिद्दी’ चित्रपटात देव आनंद यांच्यासाठी गाणी गायले. मात्र, हे गाणे यशस्वी होऊनही त्यांना काही खास काम मिळू शकले नाही. त्यानंतर स्वतःची अशी गाण्याची वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. ‘आराधना’ चित्रपटाने गायकी क्षेत्रात ते एक यशस्वी गायक बनले. ‘फंटूश’ चित्रपटातील ‘दुखी मन मेरे’ या गाण्याने त्यांनी छाप पाडली. त्यानंतर एस डी बर्मन यांनी त्यांना अनेक गाणी गाण्याची संधी दिली. किशोर कुमार यांनी हिंदी गाण्यासोबत तमिळ, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्ल्याळम, उडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांना आठ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे. किशोर कुमार यांची काही प्रसिद्ध गाणीः आने वाला पल जाने वाला है, ओ मेरे दिल के चैन, खाईके पान बनारस वाला, गीत गाता हूँ मैं, चलते चलते मेरे ये गीत, चिंगारी कोई भड़के, छूकर मेरे मन को,प्यार दीवाना होता है, फूलों का तारों का, दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, मुसाफ़िर हूँ यारो, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, रोते हुए आते हैं सब, सागर जैसी आँखों वाली, हम हैं राही प्यार के, हमें तुमसे प्यार कितना, ज़िंदगी इक सफ़र है सुहाना…
१३ ऑक्टोबर १९८७ साली हृद्यविकाराच्या झटक्याने किशोर कुमार यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा सुरेल आवाज आणि अभिनय सर्वांच्या लक्षात राहील.

First Published on August 4, 2013 2:53 am

Web Title: 84th anniversary of kishor kumar