01 March 2021

News Flash

‘अ फेअर डील’ प्रेमाची द्राविडी चिकित्सा

लग्नाआधी आकाशीचे चंद्र-सूर्य आणून देण्याचं अभिवचन देणारा प्रियकर लग्नानंतर मात्र आपल्याशी तितक्या उत्कटतेनं, अनावर ओढीनं वागत-बोलत नाही.. एकेकाळी आपल्या मनातलं काहीही आरशातल्यासारखं सहज वाचणारा, आपल्याला

| June 7, 2015 02:09 am

लग्नाआधी आकाशीचे चंद्र-सूर्य आणून देण्याचं अभिवचन देणारा प्रियकर लग्नानंतर मात्र आपल्याशी तितक्या उत्कटतेनं, अनावर ओढीनं वागत-बोलत नाही.. एकेकाळी आपल्या मनातलं काहीही आरशातल्यासारखं सहज वाचणारा, आपल्याला जे हवं असे ते देण्यासाठी वाट्टेल ते साहस करणारा प्रियकर- नवरा झाल्यावर मात्र आपला वाढदिवसही विसरून जातो, तेव्हा पत्नी झालेल्या प्रेयसीला- आपण भावनेच्या भरात याच्याशी लग्न केलं ही आपली चूक तर झाली नाही ना, असा प्रश्न पडतो. ह्य़ाचं आपल्यावर प्रेमच उरलेलं नाही याची तिला खात्रीच पटते. आणि मग ती खऱ्या प्रेमाच्या शोधात वणवणू लागते.. अगदी वाच्यार्थानं जरी नाही, तरी मानसिकदृष्टय़ा का होईना!

परंतु खरं प्रेम तिला त्यानंतर तरी सापडतं का?

याच्या उलट आजची पिढी! तिला प्रेमात पडायला आणि ब्रेकअप्ला जराही वेळ वा कारण लागत नाही. बरं, ब्रेकअप्चं दु:ख करत बसायलाही त्यांच्याकडे वेळ नसतो. ‘रात गयी, सो बात गयी’ इतक्या सहजतेनं ब्रेकअप्नंतर ते दुसऱ्या ‘रिलेशनशिप’मध्ये शिरतात. या पिढीची ही व्यवहारी वृत्ती म्हणायची, की भावनांना त्यांच्या आयुष्यात काही स्थानच नाही, असं समजायचं? की खऱ्या भावनांशी त्यांचा परिचयच झालेला नसतो?.. प्रश्नच आहे!

..आणि बरं मग हे चांगलं की वाईट? प्रेमभंगामुळे नैराश्याच्या खाईत कोसळण्यापेक्षा आणि त्यापायी जुन्या पिढीतल्या प्रियकर-प्रेयसींसारखं आयुष्य बरबाद करून घेण्यापेक्षा हे चांगलंच ना! कसलाही धक्का पचवायची त्यांची ही ‘शॉकप्रूफ’ वा ‘शॉक अॅब्सॉर्बर’ वृत्तीच त्यांना आयुष्यात भीषण संकटं आणि जीवघेणे खाचखळगे यांतून तारू शकेल की!

पण मग ह्य़ांना अस्सल आनंद, तीव्र दु:ख आणि आयुष्यभर सलणाऱ्या व्यथा-वेदना यांचा अनुभव येणार तरी कसा? आणि आयुष्यातले हे चढउतार अनुभवल्याविना, त्यातून तावूनसुलाखून निघाल्याशिवाय आयुष्याचं मोल, जगण्याबद्दलची प्रगल्भ जाण आणि त्याचं महत्त्व तरी ह्य़ांना कसं कळणार?

मागच्या पिढीची ती तशी गोची.. आणि यांची अशी! यात चांगलं काय अन् वाईट काय, कसा निवडा करायचा?

नाटककार-दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे यांनी आजच्या माणसांच्या जगण्याचा हा तिढा त्यांच्या ‘अ फेअर डील’ या नव्या नाटकात मांडला आहे. ‘प्रेम’ या गोष्टीबद्दल त्यांना कायमच कुतूहल वाटत आलेलं आहे, हे त्यांच्या आजवरच्या नाटकांतून ध्यानात येतं. ‘नेव्हर माइंड’, ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘चाळिशीतले चोर’ या story--6त्यांच्या आधीच्या नाटकांतूनही प्रेम आणि स्त्री-पुरुष संबंधांतली वळणंवाकणं त्यांनी आपल्या तिरकस लेखणीतून, काकदृष्टीनं विनोदाच्या अवगुंठनात रंजकतेनं पेश केली आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणू या हवं तर- ‘अ फेअर डील’ हे आजच्या आणि मागच्या पिढीच्या प्रेमाची द्राविडी चिकित्सा करणारं नाटक आहे असंच म्हणावं लागेल.

यातले गौतम आणि निकिता हे सध्या परस्परांच्या प्रेमात.. आय मिन रिलेशनशिपमध्ये आहेत. गौतम कॉलेजसाठी एकांकिका बसवतोय. त्यानं आपल्या कॉलेजातल्या अनुजाच्या एकांकिकेची त्याकरता निवड केलीय. आणि ही गोष्ट निकिताला अजिबात आवडली नाहीए. आपण लिहिलेली एकांकिका गौतमने करावी यासाठी ती त्याच्याशी हुज्जत घालतेय. परंतु भावना आणि व्यवहार या दोन गोष्टी वेगळा ठेवणारा गौतम जिने आजवर एकही एकांकिका लिहिलेली नाही अशा निकिताची एकांकिका करण्याची रिस्क घेऊ शकत नाही. तसं तो तिला स्पष्ट सांगतो. त्यावरून ती त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध क्षणात तोडायला निघते. तेव्हा कुठं नाइलाजानं तो तिच्या एकांकिकेचं वाचन ऐकायला राजी होतो.

निकिता एकांकिका वाचत असतानाच त्याच्या लक्षात येतं, की तिच्यात नक्कीच ‘स्टफ’ आहे. प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ताकद आहे. निकितानं आईच्या (देवयानी) खासगी डायरीवरून ती लिहिलेली असते. आपल्या आईचे कुणा गुरू नामक माणसाशी विवाहबाह्य़ संबंध आहेत, याचा सुगावा तिला त्या डायरीतून लागलेला असतो. आणि ती निनावी फोन करून वडिलांना (मंदार) त्याबद्दल सावध करू पाहते. परंतु मंदार मात्र ते फोन मनावर घेत नाही. त्यामुळे तर ती भयंकरच अस्वस्थ होते. त्याचीच परिणती म्हणजे ही एकांकिका!

गौतमला हे सगळंच भन्नाट वाटतं. तो तिला आईच्या संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवायला सांगतो आणि वडिलांना याबद्दल थेटपणे सांग असं सुचवतो. परंतु वडील आपलं म्हणणं ऐकून त्यावर विश्वास ठेवतील का, याबद्दल तिला शंका असते. आपल्या आई-वडिलांमध्ये आताशा संवाद उरलेला नाही, हेही ती जाणून असते. (जरी ते तिच्यासमोर ‘नॉर्मल’ वागत असले, तरीही!)    

मंदार आपल्या नोकरीत येनकेन प्रकारेण प्रगतीचे सोपान चढण्यात व्यग्र असल्याने देवयानीच्या गुरूबरोबरच्या संबंधांकडे त्याने हेतुत:च दुर्लक्ष केलेलं असतं. असं केलं तरच आपल्याला करिअरवर लक्ष केंद्रित करता येईल अशी त्याची धारणा असते. त्या तिघांत तसा अलिखित करारच झालेला असतो. तो  कुणाला कळू नये अशी मंदारची इच्छा असते. परंतु देवयानीच्या विवाहबाह्य़ संबंधांबद्दल माहिती देणाऱ्या सततच्या निनावी फोनमुळे तोही अस्वस्थ झालेला असतो. याचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा, या निर्णयाप्रत तो येतो.

त्याचवेळी निकिता आपणच ती निनावी फोन करणारी व्यक्ती असल्याचं उघड करते आणि आईचे गुरूबरोबरचे संबंध मंदारच्या कानावर घालते..

त्यानंतर काय घडतं, हे सांगण्यापेक्षा त्याकरता नाटक बघणंच इष्ट.. नाही का?

लेखक-दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे यांचं हे नाटक वरकरणी प्रेम आणि विवाहबाह्य़ संबंध याबद्दल आहे असं वाटत असलं तरी ते त्यापलीकडे जात एकूणच मानवी जीवनातील भावभावना- त्यातही प्रेमासारखी माणसांना परस्परांशी बांधून ठेवणारी उत्कट भावना.. त्यात कालौघात होत गेलेले बदल.. हे स्थित्यंतर उचित की अनुचित, याबद्दलचं चिंतन आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध वाटतात तितके कळायला सोपे खचितच नाहीत, ही जाणीव घेऊनच प्रेक्षक नाटय़गृहाबाहेर पडतो. हे सारं द्राविडी रूपात डॉ. बेळे यांनी ‘ए फेअर डील’मध्ये मांडलेलं आहे. त्यात नाटय़पूर्णत: आहे. धक्कातंत्र आहे. परंतु वास्तव आणि फॅन्टसी यांतली धूसर रेषा डॉ. बेळे यांना प्रयोगात नीट संक्रमित करता आलेली नाही. गुरू या पात्राच्या अस्तित्वाबद्दलचं नाटककाराचं विवेचन पचनी पडणं त्यामुळे कठीण जातं. याचं कारण- मंदारच्या घरात त्याचा मुक्तपणे वावर दाखवलेला आहे, आणि त्याचवेळी मंदार समोर येताच तो लपू पाहतो. असं असताना त्याच्या आभासी अस्तित्वाचा मुद्दा येतोच कुठे? या विरोधाभासाची संगती नाटकात लागत नाही. त्यामुळे मंदार आणि देवयानी यांच्यातील बेबनावाचा प्रसंगही त्यामुळे खोटा ठरतो. याअर्थी नाटका प्रयोगारूपात काहीतरी निश्चितच गफलत झाली आहे. ती निस्तरल्याविना लेखकाच्या विवेचनाशी प्रेक्षक सहमत होणार नाहीत. दुसरीकडे तरुण पिढीच्या प्रेमासंबंधातील वास्तव मात्र त्यांनी अचूक टिपलं आहे. या पिढीची संभ्रमावस्था, त्यांचं भावनारहित जगणं (‘इम्पल्सिव्ह’ म्हणूया हवं तर!) त्यांनी विलक्षण भेदकपणे मांडलेलं आहे. दोन पिढय़ांच्या दृष्टिकोनांतला हा फरक अधोरेखित करताना त्यांनी नाटकात योजलेला ‘नाथाघरची उलटी खूण’ हा द्राविडी मांडणीचा प्रकार उत्तम जमला असला तरी त्यांना तो तपशिलात झेपलेला नाही. परिणामी नाटकाच्या शेवटाकडे प्रेक्षकही संभ्रमात पडतो. लेखकाचं विवेचन बळेबळे त्याला पचनी पाडून घ्यावं लागतं. दिग्दर्शक म्हणून डॉ. बेळे यांचं हे अपयश आहे.

नेपथ्यकार राजन भिसे यांनी मंदारचं बाल्कनीसहचं प्रशस्त घर उत्तमरीत्या उभं केलं आहे. समर नखाते व प्रदीप वैद्य यांची प्रकाशयोजना नाटय़पूर्णतेत भर घालते. नरेंद्र भिडे यांचं संगीत आणि रश्मी रोडे यांची वेशभूषाही चोख.

आनंद इंगळे यांनी आपल्यावर बसू पाहणारा विनोदी नटाचा शिक्का झुगारून देण्यासाठीच बहुधा मंदारची ही भूमिका स्वीकारली असावी. त्यांच्यातल्या अभिनेत्याला हे नक्कीच आव्हान होतं. त्यांनी संयत अभिनयाद्वारे ते समर्थपणे पेललं आहे. मंदारची व्यस्तता, त्यातून आलेली बेफिकीरी, त्याचवेळी आतून कुठंतरी आपलं चुकतंय याची लागलेली बोच, तसंच आजच्या पालकपिढीचा समंजसपणा सुयोग्य देहबोलीसह त्यांनी समूर्त केला आहे. मंजुषा गोडसे यांनी देवयानीची तगमग, नवऱ्याकडूनच्या अपेक्षांना तडा गेल्यानं होणारी घुसमट, मनात जपलेल्या ‘गुरू’शी मंदारची होणारी स्वाभाविक तुलना आणि त्यातून येणारं वैफल्य उत्कटरीत्या दाखवलं आहे. गुरूमधला बेछूट, बेदरकार, सर्वस्व झोकून देणारा प्रियकर- नचिकेत देवस्थळी यांनी साक्षात् उभा केला आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी संभ्रमित, आत्मकेंद्रित प्रेयसी- मृण्मयी देशपांडे यांनी यथार्थपणे वठवली आहे. वडिलांबरोबरच्या तिच्या संवादात तिची तीच स्वत:ला सापडत जाते तो सगळा प्रसंगच भयंकर लोभस झाला आहे. सौरभ गोगटे यांनी आजचा व्यवहारी, भावना व वास्तव यांची बिलकूल सरमिसळ होऊ न देणारा तरुण प्रियकर (गौतम) त्याच्या कन्व्हिक्शनसह छान उभा केला आहे. त्यांच्या साऱ्या देहबोलीत आत्मविश्वास आणि स्पष्टता (ू’ं१्र३८) जाणवते.

आजच्या तसंच मागील पिढीच्या प्रेमाकडे आणि एकूणच आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांची रंजक चिकित्सा करणारं हे नाटक त्यातल्या ‘द्राविडी प्राणायामा’चे दिग्दर्शकानं अधिक पटण्याजोगे समर्थन दिल्यास आणखीन प्रभावी होईल, हे नि:संशय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 2:09 am

Web Title: a fair deal drama review
Next Stories
1 टीका करणे ही ‘फॅशन’च झालीय..
2 शाहरुख आणि भन्साळींच्या चित्रपटात स्वप्निल हीरो!
3 लैंगिकतेपलीकडचा..
Just Now!
X