News Flash

त्या नावाप्रमाणेच ‘देवी’ होत्या- जतिन वाल्मिकी

श्रीदेवी यांना निरोप देताना चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला

श्रीदेवी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच कलाविश्वासोबत चाहत्यांनाही धक्का बसला. एकाएकी त्यांचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारं ठरलं. अशा या आवडत्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप घेण्यासाठी सध्या चाहत्यांचे पाय श्रीदेवी मुंबईतील लोखंडवाला येथे असणाऱ्या सेलिब्रेशन स्पोर्स्ट क्लबकडे वळत आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव भारतात आणल्यानंतर ग्रीन एकर्स परिसरातही एकच गर्दी होण्यास सुरुवात झाली. याच गर्दीत उत्तरप्रदेशहून आलेल्या जतिन वाल्मिकी नावाच्या एका दृष्टीहीन चाहत्याची उपस्थितीही पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून जतिन श्रीदेवी यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या पार्थिवाची वाट पाहात होते. गरजेच्या वेळी श्रीदेवी यांनी आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेवत उपकारांची परतफेड म्हणून काही नाही पण, या अभिनेत्रीच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबई गाठली.

रुपेरी पडद्यावर ‘चांदनी’च्या रुपात श्रीदेवी यांनी आपली ओळख प्रस्थापित केली. फक्त कॅमेरासमोरच नव्हे तर कॅमेऱ्यापलीकडेही समाजाप्रती असणारी आपली बांधिलकी त्या कधीच विसरल्या नव्हत्या. अनेक चाहत्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या श्रीदेवी यांनी जतिन यांनाही काही वर्षांपूर्वी मदतीचा हात पुढे केला होता.

वाचा : BLOG : या अभिनेत्रींचं धक्कादायक जाणे…

श्रीदेवी यांनी केलेल्या मदतीविषयी जतिन यांनी यावेळी माध्यमांसमोर उलगडा केला. ‘माझ्या भावाच्या ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रियेसाठी मला दोन लाख रुपयांची आवश्यकता होती. तेव्हा मी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे गेलो होते. त्यांनी मला मदतीचे आश्वासन देत श्रीदेवी याच्यासोबत माझी भेट घालून दिली होती. तीन दिवस फेऱ्या मारल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी माझी भेट घेतली आणि मी नेमका कशासाठी आलो आहे याविषयी विचारपूस केली. भावाच्या शस्त्रक्रियेसाठी मला दोन लाख रुपयांची गरज असल्याचं कळताच त्यांनी जसलोक रुग्णालयात फोन करुन एक लाख रुपये माफ करून घेतले. त्याशिवाय त्यांनी स्वत:सुद्धा मला उर्वरित एक लाख रुपयांची मदत केली होती. आज त्यांच्यामुळे माझा भाऊ जिवंत आहे’, असं जतिन म्हणाले. श्रीदेवी यांचे आपल्यावर फार उपकार असून, त्या खऱ्या आयुष्यात नावाप्रमाणेच एक देवी होत्या ज्या नेहमी सर्वांच्या मदतीसाठी पुढे असायच्या असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जतिन आणि त्यांच्यासारखे असंख्य चाहते सध्या श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी आले असून त्यांना अखेरचा निरोप देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 10:12 am

Web Title: a fan from uttar pradesh on sridevis demise who has been waiting outside her house
Next Stories
1 ग्लॅमगप्पा : आर माधवन घायाळ
2 शब्दांच्या पलिकडले : ना कुछ तेरे बस में जूली…
3 श्रीदेवी यांचे पार्थिव ग्रीन एकर्समध्ये दाखल, उद्या दुपारी अंत्यसंस्कार
Just Now!
X