22 October 2019

News Flash

भेट झाली नाही म्हणून KGF स्टार यशच्या चाहत्याने घेतले पेटवून

70 टक्के भाजलेल्या चाहत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

सध्या बॉलिवूडसहित सगळीकडेच दाक्षिणात्य अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ’ची चर्चा सुरु आहे. दक्षिणेकडे तर चित्रपटाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनी चित्रपट डोक्यावर घेतला असून अभिनेता यशला भेटण्यासाठी चाहते घराबाहेर गर्दी करत आहेत. दरम्यान अशाच एका चाहत्याने आपल्या लाडक्या अभिनेत्याची भेट होऊ न शकल्याने स्वत:ला पेटवून घेतलं. रवी रघुराम असं या चाहत्याचं नाव आहे.

यश याच्या वाढदिवसानिमित्त भेट घेण्यासाठी रवी रघुराम त्याच्या घराबाहेर गेला होता. यावेळी वॉचमनने यश शहरात नसल्याचं सांगितलं. भेट होऊ न शकल्याने निराश झालेल्या रवीनने यशच्या घरासमोरचं अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. रवी 70 टक्के भाजला होता. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

घटनेवर यशने प्रतिक्रिया दिली असून प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ‘गतवर्षी माझ्या वाढदिवसाला त्याने माझ्यासोबत सेल्फी काढले होते. पण माफ करा अशा लोकांना चाहता म्हणू शकत नाही. इतकं टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती मी चाहत्यांना करतो. वाढदिवसाच्या काही दिवस आधी मी एक व्हिडीओ टाकत वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं होतं. हे अत्यंत वेदनादायी आहे’, असं यशने म्हटलं आहे.

‘हे चाहत्यांचं प्रेम आहे का ? नक्कीच नाही…मला तरी नाही वाटत. मी नेहमी माझ्या चाहत्यांना जबाबदार होण्यास सांगितलं आहे. सोशल मीडिया, मुलाखतींमधून मी अनेकदा माझ्या चाहत्यांना सांगितलं आहे की, माझं कौतुक करायचं असेल तर जबाबदार व्हा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, एक चांगला माणूस व्हा’, असं यशने सांगितलं.

यशने बंगळुरुमधील विक्टोरिया रुग्णालयात जाऊन रवीची भेटही घेतली होती. पण आपण यापुढे अशा चाहत्यांना भेटणार नाही, कारण यामुळे चुकीचं उदाहरण उभं राहतं असं सांगितलं.

First Published on January 11, 2019 6:36 pm

Web Title: a fan of kgf star yash burned himself for not getting chance to meet