देशभक्तीपर आणि युद्धांवर आधारित बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हीच गोष्ट लक्षात ठेवत निर्माते भूषण कुमार भारतीय नौदलावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. डिसेंबर चार हा भारतासाठी गौरवशाली दिवस आहे. १९७१ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान, याच दिवशी भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता. याच घटनेवर आधारित ‘नेव्ही डे’ या चित्रपटाची निर्मिती ते करत आहेत. तनुज गर्ग, अतुल कस्बेकर आणि स्वाती अय्यर चावला यांच्यासोबत मिळून ते चित्रपट निर्मिती करणार आहेत. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

‘ऑपरेशन ट्रायडंट’ नावाने मोहीम हाती घेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले होते. या मोहिमेचे नेतृत्व अॅडमिरल सरदारीलाल मथरादास नंदा करत होते. तर या मोहिमेची आखणी गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांनी केली होती. भारतीय नौदलाने एका रात्रीत पाकिस्तानची तीन जहाजे उदध्वस्त केली. तसेच क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला. कराची बंदराची धुळधाण उडवल्यानंतर भारतीय नौदलाने अजून एक पराक्रम गाजवला. पाकिस्तानी नौदलाकडे असलेली तेव्हाच्या काळातील बलाढ्य़ पाणबुडी पीएनएस गाझी नौदलाने बुडवली. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाचे सामर्थ्य अधिकच खच्ची झाले.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात चित्रपटाची संहिता तयार करण्यात येणार असून त्यानंतर यातील भूमिकांसाठी कलाकारांची शोधाशोध सुरू होईल. कलाकारांची निवड झाल्यानंतर तीन ते चार महिने चित्रपटासाठी जोरदार तयारी करण्यात येईल आणि त्यानंतर शूटिंगला सुरुवात होईल. रजनिश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२०च्या अखेरीस किंवा २०२१च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.