दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून अभिनेता इशान खत्तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओपनिंग चित्रपटाचा मान मिळालेल्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’मधील इशानच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्याच्या दमदार अभिनयाचा प्रत्यय देणारा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटात इशानने धोबी घाटमध्ये राहणाऱ्या एका मुलाची (आमिर) व्यक्तिरेखा साकारत आहे. ट्रेलरवरून याची कथा मुंबई शहरात फिरणारी आहे हे स्पष्ट दिसते. इशानच्या मोठ्या बहिणीची (तारा) भूमिका मल्याळम अभिनेत्री मालविका मोहननने साकारली आहे. पैसा कमावण्यासाठी इशान कशाप्रकारे अमली पदार्थांची तस्करी करू लागतो, बहिण ताराला तुरुंगवासात का जावं लागतं आणि तिला बाहेर काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये इशानसमोर वेगळीच परिस्थिती निर्माण होते, या सर्व गोष्टींचं चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. या ट्रेलरमध्ये अभिनेता गौतम घोसेने साकारलेल्या भूमिकेचीही झलक पाहायला मिळते.

PHOTOS: जान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’

इशान आणि मालविका यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी दमदार अभिनयाने दोघंही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतील असं म्हणायला हरकत नाही. टर्कीतल्या आंतरराष्ट्रीय बोस्फोरस चित्रपट महोत्सवात International Bosphorus Film Festival इशानला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चांगलाच चर्चेत आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर कशाप्रकारे कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.