|| रवींद्र पाथरे

अलीकडे मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांना सस्पेन्स ड्रामा आवडू लागलाय असं दिसतंय. कारण ‘गुमनाम है कोई’ आणि ‘अ परफेक्ट मर्डर’ ही दोन नाटकं सध्या रंगभूमीवर सुरू असून दोन्हींना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुख्य धारा रंगभूमीच्या प्रेक्षकांनी रहस्यमय, गूढ नाटकं स्वीकारल्याची ही लक्षणं म्हणायची का? असो. ‘बदाम राजा प्रॉडक्शन्स’चं नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’ हे आल्फ्रेड हिचकॉकच्या कलाकृतीवर आधारित सस्पेन्स नाटक पाहण्याचा योग नुकताच आला. ‘मर्डर मिस्ट्री’ स्वरूपाचंच हे नाटक असलं तरी त्याचा सूत्रधार कोण आहे, हे पहिल्या प्रवेशापासूनच प्रेक्षकांना माहीत होतं आणि तरीही नाटक त्यांना बांधून ठेवतं, हे या नाटकाचं वेगळं वैशिष्टय़ आहे.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

मीरा आणि निरंजन हे एक तरुण जोडपं. निरंजन रणजी क्रिकेटपटू. भारतीय संघातूनही एक मॅच खेळलेला. मीरा त्याची चाहती. त्यातून त्यांचं लग्न झालेलं. परंतु निरंजनच्या सततच्या मॅचेसमुळे मीराला घरात एकटेपण खायला उठतं. त्यातून त्यांची सतत भांडणं होतात. पण निरंजनचं क्रिकेटवेड काही कमी होत नाही.

मीराचं पूर्वी दिव्यजीत चौधरी या सस्पेन्स थ्रिलर कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकावर प्रेम होतं. पण तिनं लग्न केलं ते मात्र क्रिकेटपटू निरंजनसोबत. मात्र, निरंजनसोबत वारंवार उडणाऱ्या खटक्यांमुळे मीरा पुन्हा दिव्यजीतकडे वळते. त्यांची पत्रापत्री सुरू होते. पत्रं वाचून झाल्यावर ती दोघं फाडून टाकत असत; जेणेकरून ती कुणाच्या हाती पडू नयेत. मात्र, मीराला जीतचं एक पत्र एवढं आवडलं होतं, की तिने ते फाडून न टाकता स्वत:जवळ जपून ठेवलं होतं. ती ते निरंजनच्या हाती लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घेई. जीत आणि मीरा एकमेकांच्या पुन्हा जवळ येऊ लागले होते.

..आणि अचानक निरंजनने क्रिकेटला रामराम ठोकून मीराला वेळ द्यायचं कबूल केलं. आणि खरोखरच तो आपल्या शब्दाला जागलाही. त्यामुळे मीरालाही आनंद झाला होता. पण ते एकदा सिंगापूरला जात असताना विमानतळावर मीराची पर्स हरवते. त्यात जीतचं ‘ते’ पत्रही असतं. त्यामुळे मीरा भयंकर अस्वस्थ होते. ते रीतसर तक्रार नोंदवतात. पंधरा दिवसांनी ती पर्स सापडते. त्यातला सर्व ऐवज जशाच्या तसा सापडतो.. फक्त ‘ते’ पत्र सोडून! मीराच्या बेचैनीत आणखी भर पडते ती घराच्या दरवाजावर लावून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे! तिने दहा हजार रु. दिले तर ‘ते’ पत्र परत करण्याचं आश्वासन त्या चिठ्ठीत होतं. मीरा ब्लॅकमेल करणाऱ्यापासून सुटका व्हावी आणि ते पत्र परत मिळावं म्हणून चिठ्ठीत नमूद केलेल्या बँक खात्यात दहा हजार रुपये भरतेही. परंतु पुन्हा तशीच एक चिठ्ठी दरवाजाला लावलेली आढळते.. पैसे मागणारी! ती बँकेत चौकशी करते तेव्हा त्या बँक खातेदाराचा तपशील बोगस असल्याचं आढळतं. तिने बँकेत भरलेले पैसेही तसेच असतात. खातेदारानं त्या पैशाला हात लावलेला नसतो. या सगळ्या घटनाचक्रामुळे मीरा सैरभैर होते. काय करावं तिला सुचत नाही. ती जीतला तातडीनं बोलावून घेते.. अर्थात निरंजन घरी नसतानाच!

घडला प्रकार ती जीतला सांगते. आता यातून मार्ग काय, असं ती घाबरून जाऊन विचारते. जीत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. सस्पेन्स थ्रिलर लिहिणारा लेखक असल्याने तो त्यामागचा कार्याकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं हे बोलणं चाललेलं असतानाच निरंजन अचानक घरी येतो. गोंधळलेली मीरा जीतची आपला लेखक मित्र म्हणून नवऱ्याशी ओळख करून देते. निरंजनने नाटकाची तिकिटं काढून आणलेली असतात. पण अचानक त्याच्या बॉसने कंपनीचं काम उद्याच्या उद्या पूर्ण करण्याची ताकीद दिल्याने त्याला घरी बसून ते पूर्ण करावं लागणार असतं. तो मीराला जीतबरोबर नाटकाला जायला सांगतो. त्याचबरोबर उद्या आपण क्रिकेटपटूच्या क्लबमध्ये ड्रिंक्स घ्यायला जाऊयात असं निमंत्रणही देतो.

ते दोघं नाटकाला गेल्यावर निरंजन कॅप्टन करमरकर या गृहस्थांना त्यांची सेकंड हँड गाडी विकत घेण्यासाठी म्हणून घरी बोलावतो. त्याप्रमाणे ते येतात. निरंजन इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांना त्यांचं खरं रूप आपल्याला समजल्याचं सांगतो. तो एक लफंगा माणूस असतो. पैशासाठी काहीही करणारा! बायकांनाही नादी लावणारा. निरंजन त्याला मीराला मारण्याची सुपारी देतो. त्यासाठी आखलेला फुलप्रूफ प्लॅनही तो त्याला सांगतो. त्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचं आमिष तो करमरकरला दाखवतो. त्यापैकी एक लाख रु. रोख त्याच्या हाती सुपूर्द करतो. आधी आढेवेढे घेत अखेर करमरकर त्याकरता राजी होतो.

दुसऱ्या दिवशी जीतला क्लबमध्ये घेऊन गेल्यावर करमरकरने मीराचा खून करायचा असं ठरतं. निरंजन सगळे बारीकसारीक तपशील करमरकरला समजावून देतो; जेणेकरून आपला त्यात किंचितही सहभाग नव्हता असं परिस्थितीजन्य चित्रं उभं राहावं.

प्रत्यक्षात करमरकर मीराच्या मानेभोवती स्कार्फचा गळफास आवळत असताना जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या मीराच्या हाती शिलाई मशीनची कात्री लागते. ती, ती मारेकऱ्याच्या पाठीत खुपसते. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मारेकरी सटपटतो. त्याची मीराच्या मानेवरची पकड सैल होते. तो खाली कोसळतो. गतप्राण होतो. या सगळ्या घटनाक्रमाने भ्यालेली मीरा निरंजनला फोन लावते आणि झालेली गोष्ट त्याला सांगते. निरंजन लगोलग घरी परत येतो. घडल्या प्रकाराने तोही भांबावतो.

पुढे काय? मीराचा खून करण्याची निरंजनची योजना फसल्यानं तो माघार घेतो का? काय होतं पुढे..?

लेखक नीरज शिरवईकर यांनी ही मर्डर मिस्ट्री तपशिलांच्या अंगानं बारकाईनं विणली आहे. निरंजनने ज्या बारकाव्यांनिशी मीराच्या खुनाचा कट रचला होता. तो अयशस्वी होऊनही निरंजन नाउमेद होत नाही. परंतु पोलीस त्याहून हुशार निघतात. ते कसे, हे समजून घ्यायचं असेल तर ‘अ परफेक्ट मर्डर’ बघण्याशिवाय पर्याय नाही. लेखकानं यात दोन दीर्घ प्रवेश योजले आहेत; ज्यात प्रस्तावनावजा अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवल्या जातात. किंबहुना त्यांच्या साक्षीनंच सगळं घडतं.. घडवलं जातं. आणि तरीही प्रेक्षक नाटकात गुंतून राहतात. याचं बरंचसं श्रेय लेखकाला आणि तितकंच दिग्दर्शक विजय केंकरे यांना जातं. वरकरणी हा रहस्यखेळ साधा-सरळ आणि सोपा वाटत असला तरी त्यातल्या बारीकसारीक खाचाखोचांतून पोलीस इन्स्पेक्टर घारगे खऱ्या कटकर्त्यांपर्यंत पोहोचतात. गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही त्याच्या नजरचुकीनं किंवा अनवधानानं अशी एखादी गोष्ट तो करून बसतो, की त्यानेच तो गोत्यात येतो आणि पकडला जातो असं म्हणतात. इथंही इन्स्पेक्टर घारगे  मोठय़ा हिकमतीनं दुवे जोडत आणून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळतात. रहस्यनाटय़ात सहसा न आढळणारा उपहासात्मक विनोदाचा वापर लेखकानं इन्स्पेक्टर घारगे या पात्राच्या रूपात सुंदररीत्या केला आहे. जीत हे लेखक पात्र वास्तव आणि काल्पनिकतेतलं आश्चर्यकारक साधम्र्य दाखविण्यासाठी योजण्यात आलेलं आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पहिल्या अंकात काहीशा ठाय लयीत जाणाऱ्या या नाटकाला उत्तरार्धात गती दिली आहे. उगीचच थरारक सिच्युएशन निर्माण न करता पोलिसी खाक्याने खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचं तंत्र ‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये अवलंबिलं आहे. उत्तम सस्पेन्स थ्रिलर लिहिणारा लेखकही गुन्ह्याची उकल त्यातल्या गाठी-निरगाठी अलगद सोडवत कशा प्रकारे करत असतो, हे जीत या पात्राच्या कल्पनाशक्तीशी साधम्र्य दाखविणाऱ्या या मर्डर मिस्ट्रीतील समांतर खाचाखोचांतून दाखविलं गेलं आहे. अर्थात हे मूळचे पाश्चात्त्य कथानक असल्याने यात काही अकल्पित गोष्टी घडताना दाखविल्या आहेत. त्यातल्या सत्यासत्यतेकडे प्रेक्षकांचा क्षणभर काणाडोळा व्हावा इतक्या खरेपणानं त्या ‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये घडतात. विजय केंकरे यांनी हे सर्व नाटय़ नैसर्गिक शैलीत रंगमंचावर मंचित केलं आहे. त्यात कुठंही – ‘आता बघा, मी तुम्हाला कसा चकवतो!’ छाापाचं काहीही नाही. कलाकारांच्या कामातही ही नैसर्गिकता त्यांनी कायम राखली आहे. अपवाद : फक्त इन्स्पेक्टर घारगे! त्यांची नाटय़पूर्ण संवादफेक आणि रहस्यमय वर्तन-व्यवहार प्रयोगाला रंजनाची फोडणी देतो. पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या नेहमीच्या पठडीपल्याड जात यातला इन्स्पेक्टर घारगे संस्मरणीय केला आहे. दिग्दर्शकानं या सस्पेन्स ड्रामात आवश्यक तेवढीच गूढतेची मात्रा वापरली आहे. त्यामुळे हे नाटक वेगळं ठरतं. नीरज शिरवईकर यांनी नेपियन सी रोडवरील निरंजनच्या (खरं तर मीराच्या!) घराचं नेपथ्य वास्तवदर्शी केलं आहे. घराचं शिसवी लाकूडकाम आणि रचना काळाचा निर्देश करणारी आहे. शीतल तळपदे यांनी मर्डर मिस्ट्रीत दाखविल्या जाणाऱ्या गूढ वातावरणनिर्मिती करणाऱ्या प्रकाशयोजनेचा कमीतकमी वापर करत नाटकाची नैसर्गिक शैली जपली आहे. अजित परब यांनीही पाश्र्वसंगीतात ही खबरदारी घेतली आहे. मंगल केंकरे (वेशभूषा) आणि रूपेश भंडारे (रंगभूषा) यांनी काळाचे संदर्भ जपले आहेत.

अनिकेत विश्वासराव (निरंजन) यांनी मीराचा ‘कोल्ड ब्लडेड’ खुनाचा प्लॅन रचला असला तरी ते खुनशी न वाटण्याची दक्षता घेतली आहे. अनेकदा निरंजन गोत्यात येऊनही नवनव्या हिकमतींतून त्याचं त्यातून सुटू पाहणं त्याच्या तल्लख बुद्धीचं निदर्शक आहे. शेवटपर्यंत आपला तोल ढळू न देण्याची निरंजनची पराकाष्ठा त्यांनी नेमकेपणानं दाखवली आहे. सुबोध पांडेंचा कॅ. करमरकर दिसण्या-असण्यातूनही सच्चा वाटतो. श्वेता पेंडसे यांनी मीराची भावनिक आंदोलनं यथातथ्य टिपली आहेत. एक सस्पेन्स थ्रिलर लेखक आणि मीराचा स्थिरबुद्धी प्रियकर म्हणून अभिजीत केळकर (दिव्यजीत चौधरी) यांनी संयमित अभिनयातून त्याचं लेखकीय व्यक्तिमत्त्व आणि मीरावर मनापासून प्रेम करणारा प्रेमिक ही दोन्ही रूपं छान वठवली आहेत. सर्वात कमाल केली आहे ती पुष्कर श्रोत्री (इन्स्पेक्टर घारगे) यांनी! वरपांगी विनोदी वाटणारे इन्स्पेक्टर घारगे पक्कं मुरलेलं पोलिसी डोकं बाळगून आहेत, हे त्यांच्या प्रत्येक चालीतून ठसवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील ही एक अविस्मरणीय भूमिका ठरावी.