दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हरिहरने ती कास्टिंग काऊचचा शिकार झाल्याचे मान्य केले. इंडिया टुडे कॉनक्लेव साऊथ २०१८ मध्ये तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. कॉनक्लेवमध्ये सेक्सिझम इन सिनेमाः टाइम टू अॅण्ड पेट्रीआर्की या विषयावर चर्चा सुरू होती.

श्रुतीने या विषयाशी निगडीत तिचा अनुभव सांगितला. ‘मुलींना नेहमीच समाजाच्या भावनांप्रमाणे पाहिले जाते. अभिनेत्री सुंदर आणि मादक असणे आवश्यक आहे. अभिनेत्रीच्या या गुणांमुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालण्याची शक्यता जास्त असते म्हणून अनेक सिनेमांमध्ये मुलींना एक साधन म्हणून वापरले जाते. सिनेमांमध्ये अभिनेत्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असलेली भूमिका दिलीच जात नाही. मीही कास्टिंग काऊचची शिकार झाले होते. एका कन्नड सिनेमाच्या ऑडिशनला गेले असता मला तिथे विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्या सिनेमाच्या निर्मात्याने मला सांगितले की, या सिनेमात एकूण पाच निर्माते आहेत, ते कोणत्याही पद्धतीने माझा वापर करुन घेऊ शकतात.’

श्रुती पुढे म्हणाली की, ‘या प्रकरणात महिलांचं शांत राहणं हा काही उपाय असू शकत नाही. समाज पुरूषप्रधान असल्यामुळे महिलांना मोकळीक नाही. पण सिनेमातील स्त्री-प्रधान भूमिकांमुळे समाजात त्यांचे स्थान अधिक प्रबळ होण्यास मदत होत आहे. अधिकतर मुलींनी कास्टिंग काऊचचा सामना स्पष्टपणे नकार देऊन करणे गरजेचे आहे. अशा प्रकारासाठी फक्त पुरूषांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कास्टिंग काऊचमुळे तुम्हाला पहिला ब्रेक कदाचित मिळतही असेल. मात्र त्यावर करिअर घडवता येत नाही.’