‘द मोझार्ट ऑफ मद्रास’ अशी ख्याती लाभलेले व वेगळ्या धाटणीच्या रचना करणारे संगीतकार ए. आर. रेहमान यांना यंदाचा हृदयनाथ पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘हृदयेश आर्टस’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ७८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते रेहमान यांना हा पुरस्कार देण्यात येईल. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात २६ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होत आहे. या वेळी एक विशेष सांगीतिक सोहळाही रंगणार आहे. लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाला हा पुरस्कार देण्यात येतो, असे ‘हृदयेश’चे अविनाश प्रभावळकर यांनी सांगितले. आतापर्यंत लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सुलोचनादीदी व पं. हरिप्रसाद चौरासिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.