महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील चरित्रपट पाहिला. चित्रपट निखळ करमणूक करणारा असला तरी चित्रपटातील काही प्रसंग खटकणारे तसेच पुलं आणि अन्य काही दिग्गज व्यक्तिमत्वांविषयीचे मत प्रतिकूल चित्र निर्माण करणारे आहेत.

पुलं आणि अन्य मान्यवर (पं भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे) दारु पिणारे होते हे जरी खरे असले तरी चित्रपटात ते ज्या प्रकारे दाखवले आहेत ते पाहून ही मंडळी दारु पिण्यासाठी काहीही करायला तयार होती असे चित्र रंगवले गेले आहे. हिराबाई बडोदेकर यांच्या घरी दारु प्यायला नक्की मिळेल म्हणून पुलं, भीमसेन, वसंतराव रात्री त्यांच्या घरी जातात तो प्रसंग. तसेच पुलंच्या लग्नानंतर त्यांच्या सासुरवाडीला पूजा असते त्या दिवशी खास विलायतेहून आणलेली दारु पिण्यासाठी पुलं आणि वसंतराव त्यांच्या घरी जातात, तिथे पितात आणि घरी परतताना अण्णा कर्वे यांच्या घरी पुन्हा एकदा प्यायला बसतात तो प्रसंग खटकणारा आहे. मुळात पुलंच्या जीवनात हे प्रसंग खरोखरच घडले होते की चित्रपटासाठी ते स्वातंत्र्य घेण्यात आले? समजा हे प्रसंग जरी खरे असले तरी ते दाखवणे टाळता आले असते.

पुलंचे वडील निष्णात ज्योतिषी होते, त्यांनी सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे व्हायचे असा त्यांचा लौकिक होता मग पुलंचे पहिले लग्न ज्या मुलीशी ठरवले जाते/केले जाते ती मुलगी अल्पायुषी आहे हे त्यांना कसे कळत नाही? किंवा त्यांना ते कळलेले आहे पण केवळ शब्द दिला आहे म्हणून हे लग्न व्हावे असे म्हटल्याचे तरी दाखवायला हवे होते. मुळात कोणतेही वडील किंवा लग्न करणारा मुलगा मुलगी अल्पायुषी आहे हे कळल्यावर लग्नाला तयार होईल असे वाटत नाही. पुलं समाजवादी होते, त्यांचा या भविष्य वगैरे प्रकारावर विश्वास नव्हता. त्यामुळे जिच्याशी लग्न होणार आहे ती मुलगी अल्पायुषी आहे हे आई किंवा वडील पुलंना सांगतात आणि तरीही पुलं ते ऐकत नाहीत आणि तिच्याशी लग्न करतात असे तरी दाखवायला हवे होते.

पुलं घरी-दारी सिगरेट ओढतांना दाखवले आहेत. येथे त्यांचे आईसमोर सर्रास सिगरेट ओढणे खटकते. आजच्या काळातही सिगरेट पिणारा कोणीही तरुण मुलगा घरी आई-वडिलांसोर उघडपणे सिगरेट ओढत नाही. मग त्या काळात पुलंचे आईसमोर सिगरेट ओढणे खटकणारेच आहे. आणि पुलंचे आई-वडील जर इतके पुढारलेले होते तर तसे चित्रपटात एक/दोन प्रसंगातून दाखवायला, समोर यायला हवे होते.

कलाकार मंडळी आणि त्यांचे दारु पिणे हे जगजाहीर असले, त्यांचे किस्से सगळ्यांना माहीत असले तरीही चित्रपटात हे प्रसंग टाळता येऊ शकले असते. चित्रपटातील या प्रसंगातून पुलं आणि भीमसेन, वसंतराव कसे अट्टल दारुबाज होते तेच ठळकपणे समोर आले आहे. तेच दाखवणे अपेक्षित आहे का?

चित्रपटातील कलाकारांच्या निवडीबाबत

पुलंच्या भूमिकेत सागर देशमुख एकदम चपखल. सुनील बर्वे डॉ. जब्बार पटेल म्हणून शोभत नाहीत. वसंतराव देशपांडे झालेले पद्मनाभही मला योग्य वाटले नाहीत. मात्र चित्रपट कुठेही रेंगाळवाणा होत नाही तो वेगवान आहे. पहिल्या भागानंतर आता पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार्‍या दुसर्‍या भागाबाबत उत्सुकता वाढली आहे हे नक्की.

शेखर जोशी
११ जानेवारी २०१९