‘शोले’ चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र पाण्याच्या टाकीवर चढून ‘सुसाईsssड’ असे ओरडत असलेल्या त्या दृश्याचा कोणालाच विसर पडलेला नाही. चित्रपटाच्या त्याच दृश्याची ‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी पुनरावृत्ती करण्यात येईल अशी अपेक्षा मात्र कोणीच केली नसावी. पण, त्या दृश्याची पुनरावृत्ती करण्यात आली असून, सध्या त्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. राजस्थानमधील भीलवाडा येथील एका तरुणाने थेट ३५० फुट उंचीच्या एका मोबाईल टॉवरवर चढून भन्साळींच्या ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी आणण्याचा मागणी केली आहे.

हातात पेट्रोलची बाटली घेऊन मोबाईल टॉवरवर चढलेल्या या तरुणाला सध्या खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, संपूर्ण देशात ‘पद्मावत’वर पूर्णपणे बंदी आणली जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचाच पाढा तो गिरवत असल्याचे वृत्त हाती आले आहे.

राजस्थानमध्ये ‘पद्मावत’ला होणाऱ्या विरोधाला या घटनेमुळे वेगळेच वळण मिळाले असून, करणी सेनेचा या चित्रपटाला असणारा विरोधही काही केल्या शमण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. किंबहुना चित्रपटाला करण्यात येणाऱ्या विरोधाचे स्वरुप आणखीनच तीव्र झाले असून राजस्थानमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. चित्रपटाचे स्क्रीनिंग न करण्याचा इशारा दिला असतानाही जर कोणत्या चित्रपटगृहात ‘पद्मावत’ दाखवला गेला तर मात्र त्यांना याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही करणी सेनेकडून देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्यात यावा असे आदेश दिल्यांनतरही काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळतेय. राजस्थान आणि गुजातमध्ये चित्रपटावर संकटांचे सावट आल्याचे चित्र आहे. एकीकडे राजस्थामध्ये करणी सेनेचा तीव्र विरोध आहे, तर दुसरीकडे गुजरातमध्ये मल्टीप्लेक्स मालकांनी या चित्रपटाचे स्क्रीनिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आता प्रदर्शनाची तारीख जवळ आलेली असताना देशभरात नेमक्या किती स्क्रीन्सवर ‘पद्मावत’ प्रदर्शित केला जाणार हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.