06 March 2021

News Flash

शहीद भाई कोतवाल’ मध्ये ‘ही मर्दाची कथा’

आदर्श शिंदेनी गायलं देशभक्तीपर गीत

इंग्रजांच्या गुलामीतून भारताची सुटका करताना कित्येक क्रांतिवीरांनी हौतात्म्य स्विकारलं. या क्रांतिवीरांमुळेच आपण आज स्वातंत्र्य अनुभवू शकतोय. अशाच एका क्रांतिवीराची म्हणजेच भाई कोतवालांची इतिहास जमा झालेली कथा लवकरच तत्कालीन स्मृतींना उजाळा देणार आहे ती म्हणजे ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाद्वारे. वीरभूमी सिद्धगड प्रतिष्ठान, स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शन प्रस्तुत प्रवीण दत्तात्रय पाटील निर्मित सागर श्याम हिंदुराव, सिद्धेश एकनाथ देसले सहनिर्मित आणि एकनाथ देसले आणि पराग सावंत दिग्दर्शित ‘शहीद भाई कोतवाल’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून तत्पूर्वी या चित्रपटातील रोमांचकारी देशभक्तीपर गीताचे रोकोर्डिंग अलीकडेच पूर्ण करण्यात आले आहे.

सिद्धगडच्या रणसंग्रामाची कथा रेखाटणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटामधील ‘ही मर्दाची कथा’ या एकनाथ देसले यांनी लिहिलेल्या गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचे अंगावर रोमांच उभे करणारे संगीत असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा खडा स्वर लाभला आहे. पुलवामा येथे अलीकडेच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एक आक्रोश पाहायला मिळत असतानाच ‘ही मर्दाची कथा’ सारखे देशभक्तीपर गीत आपल्या साऱ्यांनाच स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीरांची आठवण करून देईल यात काही शंका नाही. ‘शहीद भाई कोतवाल’ या महान क्रांतीकारकाची बलिदानगाथा सांगणाऱ्या या गीताच्या रेकॉर्डिंगसमयी चित्रपटात भाई कोतवाल यांच्या मध्यवर्ती भूमिकेत असणारे कलाकार आशुतोष पत्की व इंदुताई यांच्या भूमिकेत असणारी ऋतुजा बागवे यावेळी उपस्थित होती.

एकनाथ देसले लिखित-दिग्दर्शित ‘शहीद भाई कोतवाल’ हा चित्रपट आपल्याला १९४३ च्या दशकात घेऊन जातो. आझाद दस्त्याचे शिल्पकार विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांचे कार्य अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा ताफा आपल्याला दिसणार असून त्यात अरुण नलावडे, कमलेश सावंत, श्रीरंग देशमुख, गणेश यादव, मिलिंद दास्ताने, पंकज विष्णपूरकर, परवेझ खान, वकार, जॉन, अभय राणे, सिद्धेश्वर झाडबुके, एकनाथ देसले, परेश हिंदुराव, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर, प्राजक्ता दिघे आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत मोसमी तोंडवळकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असतील. विशेष म्हणजे ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकनाथ देसले यांनी चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद-गीते आणि दिग्दर्शन अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पेलल्या आहेत. या चित्रपटातील इतर गाणी सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम, आणि ऐश्वर्या देसले यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायली आहेत तर चित्रपटाचे छायांकन तुषार विभुते यांनी केले आहे तर १९४३ च्या दशकातला काळ देवदास भंडारे व उत्तम गोल्हे यांनी अतिशय सुरेख उभा केला आहे. संकलक पराग सावंत असून साहसदृश्य परवेझ खान यांनी दिग्दर्शित केली आहेत. सहाय्य्क दिग्दर्शक आशिष वड्डे, रंगभूषा उलेस खंदारे तर जगदीश धलपे कातकरी निर्माते अशी इतर श्रेयनामावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 8:54 pm

Web Title: aadarsh shinde sings patriotic song in upcoming film shahid bhai kotwal
Next Stories
1 Surgical Strike 2: जय हो ! सलमानकडून भारतीय हवाई दलाला सलाम
2 Surgical Strike 2 : ‘भारताकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचे डोळे फोडू’
3 #Mom : श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट चीनमध्ये होणार प्रदर्शित
Just Now!
X