News Flash

प्रशांत दामलेंची ‘स्पेशल भेट’

आज काय स्पेशल’. २५ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारी दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम पहायला मिळणार आहे.

प्रशांत दामले

प्राकृत मराठी भाषेत शब्दबद्ध झालेलं ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे वाक्य अन्नाचं ब्रह्मांडातील अनन्यसाधारण स्थान विशद करतो. माणसाच्या मूलभूत तीन गरजांपैकी अन्न (खाणं) ही एक मूलभूत गरज आहे. नवनवीन खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाहीत? खरंतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या पदार्थाना उत्तम न्याय मिळतो. खवय्यांमध्येसुद्धा आपल्याला बरेच प्रकार पाहायला मिळतात. काही लोक एकटेच गुपचूप खवय्येगिरी करतात आणि नंतर समाजमाध्यमांवर त्याचा देखावा करतात, काही लोक स्वत: बाहेरचं काहीच खात नाहीत, पण दुसऱ्याला चवीचं खाऊ  घालतात. तर काही स्वत:ही चवीने खातात आणि दुसऱ्यालाही तितक्याच प्रेमाने खिलवतात. एखादा पदार्थ चांगला झाला आहे की वाईट याची उत्तम पारख एक सर्वोत्तम खवय्याच करू शकतो. ‘कलर्स मराठी’ अशाच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम घेऊन आला आहे, ज्याचं नाव आहे ‘आज काय स्पेशल’. २५ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारी दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम पहायला मिळणार आहे.

एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी सर्जनशीलता आणि मेहनतीची गरज असते तसंच प्रेक्षकांना आपलंसं करण्यासाठी देखील या दोन्ही गोष्टींची सांगड असणे खूप महत्त्वाचे असते. या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीलादेखील या दोन्हींची उत्तम सांगड असलेले, आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी माणसाशी अतूट नातं जोडलेले तसेच ज्यांना उत्तम चवीची जाण आहे असे प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या रुचकर मालिकेत प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांचं प्रतिनिधित्व करणार आहेत व त्यांना एक चटपटीत ‘स्पेशल भेट’ देणार आहेत असं म्हणणं उचित ठरेल.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीगणेशाच्या आराधनानेच करतो. याचाच आधार घेत आपल्याला ही मालिका गणेशचतुर्थीपासून बघायला मिळते आहे. या शोबद्दल प्रशांत दामले म्हणतात, मी लहानपणापासूनच खवय्या आहे, मला चवीचं खायला आवडतं. श्वास घेणं जितकं  महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं खाणंदेखील आहे. खाणं ही आयुष्यातील एक अविभाज्य गोष्ट आहे असं मी म्हणेन. प्रत्येक माणूस त्या त्या वयाप्रमाणे खात असतो. जसं लहानपणी तो आईच्या हातचं पौष्टिक खातो, तरुण वयात मित्रमैत्रिणींबरोबरचं फास्ट फूड आणि लग्न झाल्यावर फिटनेससाठी केवळ उकडलेलं खातो. खाबूगिरीच्या सर्व पायऱ्या त्या त्या वयात माणूस चढत उतरत असतो. वेगवेगळ्या पद्धतीचं तिखट-गोड खात असतो. थोडक्यात वयोपरत्वे त्याच्या खाण्याच्या पद्धतीदेखील बदलत असतात, पण म्हणून खाणं कधीच वज्र्य होत नाही. कुठल्याही वयात जितक्या पद्धतीचं खाता येईल तितका जीवनाचा प्रवास सुखकर होतो. हा जो मूळ घटक आहे त्याच्याशीचं संबंधित हा शो असल्याने त्याची सूत्रं मी हातात घेतली आहेत, असं प्रशांत दामले सांगतात.

प्रिय व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. हा शो बघून तुम्हीदेखील तुमच्या जवळच्या माणसांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांची मनं जिंकू शकता. यात प्रेक्षकांना रुचकर आणि चविष्ट पदार्थ एका नव्या रूपात, नव्या पद्धतीने शिकण्याची संधी मिळणार आहे. विविध प्रांतांतील पाककृती नव्या अंदाजात बघायला मिळणार आहेत. आपण आजवर अनेक पदार्थ खात आलो; पण याच पदार्थाना नवीन पद्धतीने कसे करावे, कशी त्यांची चव वा तो पदार्थ रुचकर करावा, कसे त्यांना खुशखुशीत पद्धतीने सादर करावे असा सगळा खाण्या-खिलवण्याचा मामला शोमधून रंगणार आहे. या कुकरी शोजच्या माध्यमातून आपल्याला रोजच्याच जेवणात एक स्पेशल तडका पहायला मिळणार आहे. मला या शोजच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या ज्ञातींच्या गृहिणी भेटतात. त्यांची खाद्यसंस्कृती कळते. अनेक गृहिणी सासूसह येतात. सासू पंजाबी असते तर सून मराठी असते. मग मला सासूच्या पंजाबी तडक्याबरोबरच मराठीचा ठसकादेखील अनुभवायला मिळतो. या शोमधून आपण तेल आणि फोडणी याच्या पलीकडचं विश्व शोधायचा प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं.

‘रंगमंच, सिनेमा, टेलिव्हिजन या माध्यमांमध्ये सशक्त भूमिका करणारा, एक चांगला मित्र तसेच कलाकार आणि खवय्या म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत दामले यांना आम्ही घेऊ न येत आहोत आमच्या ‘आज काय स्पेशल’ या नव्या शोमध्ये. मी प्रशांतबरोबर गेली बरीच वर्षे काम करतो आहे. तो चवीचं खाणारा, हसत हसत आपल्यासोबत जगणं शिकवणारा, एक उत्तम-दर्जेदार कलाकार आहे. प्रशांतचा शो म्हणजेच प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देणे. प्रशांतमधील महत्त्वाचा गुण म्हणजे तो खूप निवडक कामं करतो आणि जी करतो ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. त्यामुळे प्रशांत दामले घेऊन येत असलेला आमचा हा नवा, लज्जतदार शो प्रेक्षकांची मनं जिंकेल’, असा विश्वास ‘कलर्स मराठी’चे व्यवसाय प्रमुख निखील साने यांनी व्यक्त केला.

आज काल असे अनेक कुकरी शो येतात आणि जातात. त्याचप्रमाणे समाज माध्यमांमध्ये विविध वाहिन्यांच्या माध्यमातून नवनवीन पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि लाखो लोक तो शो बघतात. अशा समाज माध्यमांच्या युगात हा शो लोक कितपत स्वीकारतील?, असा प्रश्न विचारला असता प्रशांत दामले म्हणाले, ‘समाज माध्यमांच्या कार्यक्रमाला मिनिटांची लक्ष्मणरेषा आपल्याला पहायला मिळते तर ‘आज काय स्पेशल’सारख्या मालिका तासभर तरी पहायला मिळतात. शिवाय तिथे पाककृती या सलग दाखवल्या जातात. तिकडे विनोदाचा लवलेशही नसतो. पण माझ्या या कार्यक्रमात तुम्हाला खाण्याबरोबरच विनोददेखील चाखायला मिळेल व लोक नक्कीच माझ्यासाठी व माझ्या विनोदी अभिनयासाठी ही मालिका बघतील. त्यांना मनोरंजनाबरोबरच नवनवीन पदार्थाचं ज्ञान आम्ही या मालिकेच्या माध्यमातून नक्कीच देऊ याची मला खात्री आहे’.  ‘आज काय स्पेशल’ या कार्यक्रमात भारतीय पारंपरिक पदार्थ जे आपल्या आवडीचे आहेत त्यांना नवा साज मिळणार आहे हे नक्की. कार्यक्रम रुचकर तर असेलच यात काही शंका नाही; पण तो खमंग पद्धतीने सादर करण्यात आला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 1:40 am

Web Title: aaj kay special cooking show by prashant damle on marathi colors
टॅग : Prashant Damle
Next Stories
1 गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत
2 गणेशोत्सवातच अभिनयाचा श्रीगणेशा
3 उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्याचे आज प्रसारण
Just Now!
X