बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ‘जय गंगाजल’ या हिंदी चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने आपल्या हॉलिवूडमधील मालिका आणि चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले. पण, प्रियांकाचे चाहते तिला पुन्हा हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ही ‘बेवॉच गर्ल’ लवकरच मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत काम करताना दिसण्याची शक्यता आहे.

वाचा : न्यासामुळे अजयला घ्याव्या लागताहेत झोपेच्या गोळ्या

अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावरील बायोपिक असलेल्या ‘सारे जहाँ से अच्छा’ चित्रपटात ती दिसण्याची शक्यता आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर आणि संपूर्ण टीमला प्रियांकाने चित्रपटात काम करावे असे वाटतेय. त्यासाठी त्यांनी सध्या भारतात असलेल्या या अभिनेत्रीसह काही मीटिंगही केल्या. पण, बॉलिवूड पुनरागमनासाठी प्रियांकाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. त्यामुळे ती इतर चित्रपटांना डावलून पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या राकेश शर्मांच्या चित्रपटाला प्राधान्य देणार का, ते तिच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्यावरच कळेल.

आमिर आणि प्रियांका चित्रपटासाठी तयार झाल्यास पहिल्यांदाच ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसेल. अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवणारे हे दोन्ही कलाकार चित्रपटात नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील.

वाचा : सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार सिनेमे

दरम्यान, ‘सारे जहाँ से अच्छा’ चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘सल्यूट’ असे करण्यात येण्याची शक्यता होती. पण अनेकांना ‘सारे जहाँ से अच्छा’ शीर्षक अधिक पसंत पडल्यामुळे चित्रपटाचे हेच नाव निश्चित करण्यात आल्याचे कळते. राकेश शर्मा आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यातला एक किस्साही तसा प्रसिद्ध आहे. इंदिरा गांधी यांनी जेव्हा राकेश यांना विचारले की, ‘चंद्रावरुन भारत कसा दिसतो, यावर उत्तर देताना राकेश शर्मा म्हणाले होते की, सारे जहाँ से अच्छा…’ म्हणूनच चित्रपटाचे शीर्षक हेच ठेवावे, असे आमिरलाही वाटतेय.