करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउनचा कालावधी सुरु होता. या काळात उद्योग-व्यवसायांपासून ते कलाविश्वापर्यंत अनेक क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले होते. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून कलाविश्वासह प्रत्येक क्षेत्रातील कामकाज सुरु होताना दिसत आहे. या अनलॉकच्या टप्प्यात ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट अभिनेता आमिर खानने थिएटरमध्ये जाऊन पाहिला. मात्र, त्यानंतर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिरने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणार असल्याचं सांगितलं. त्यानुसार, तो मुलगी इरा खानसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलादेखील मात्र, त्याला अनेकांनी ट्रोल केलं.

करोनाचा काळ सुरु असताना या परिस्थितीत तू लोकांपुढे नेमका कसला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतोस असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. सोबतच त्याच्या जुन्या काही वादग्रस्त वक्त्यांवरुनही त्याला खडेबोल सुनावले आहेत.

आणखी वाचा- लॉकडाउननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘सूरज पे मंगल भारी’ ; जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

दरम्यान, आमिरला चित्रपटगृहाबाहेर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. तसंच आमिरनेदेखील प्रसारमाध्यमांसमोर फोटोसाठी पोझ दिल्या. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. आमिर खान लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.