बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याने बिहार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदतनिधीला २५ लाख रुपयांचा धनादेश दिलाय. त्याचसोबत त्याने आपल्या चाहत्यांनीही पूरग्रस्तांना मदत करावी, यासाठी आवाहन केलंय.

‘दंगल’फेम अभिनेत्याने कुरिअरद्वारे २५ लाखांचा धनादेश पाठवला असून, मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या कार्यालयात तो जमा करण्यात आलाय. आमिरने एवढी मोठी रक्कम दान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी आसाम आणि गुजरात येथील पूरग्रस्तांनाही त्याने तेवढीच रक्कम मदत स्वरुपात दिली होती.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’चं पॅकअप, कारण…

आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमिरचे ट्विट करून आभार मानले होते.

बिहारमधील तब्बल सव्वाकोटी लोकसंख्या एकटवलेल्या २० जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. पूराच्या तडाख्यात आतापर्यंत ४१५ जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. तर सुमारे सात लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पुराचा सर्वाधिक फटका पूर्णिया आणि चंपारन या जिल्ह्यांना बसला. लाखो लोकांची घरे पुरात वाहून गेल्याने ते बेघर झाले आहेत. यातील अनेकांच्या पुनर्वसनाची अद्याप सोय झालेली नाही.

वाचा : PHOTOS अभिनेता आफताब शिवदासानीचा श्रीलंकेत पारंपरिक पद्धतीने विवाह

दरम्यान, ‘बिहारमध्ये पूर आलेला नाही, तर आणला गेलाय. नितिशकुमार सरकारच्या इंजिनिअरने धरण फोडून हा पूर आणला’ असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी नितिशकुमार यांच्यावर केला. त्याचबरोबर पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा केवळ ‘ड्रामा’ असल्याची टीकाही त्यांनी केलीये.