अभिनेता संजय दत्तने बुधवारी रात्री त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. संजूबाबाचे दोन जिवलग मित्र सलमान खान आणि आमिर खानसुद्धा या पार्टीला पोहोचले होते. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन आणि दिवाळी पार्ट्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून त्याचे व्यग्र वेळापत्रक आहे. यामुळे आमिरच्या कारचालकालाही आराम न करता सतत काम करावं लागत आहे. संजूबाबाच्या घरी जाताना चालक डुलक्या घेत गाडी चालवत असल्याचं आमिरच्या लक्षात आलं.

आमिरच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर संजय दत्तचं घर आहे. कार्टर रोड येथील त्याच्या घरापासून पाली हिल येथील संजूबाबाच्या घरी आमिरला पोहोचायचं होतं. झोप पूर्ण न झाल्याने चालक व्यवस्थित गाडी चालवू शकत नव्हता हे आमिरच्या लक्षात आलं. गाडी चालवताना तो डुलक्या घेत असल्याचंही कारच्या आरशात त्याने पाहिलं. ‘सिक्रेट सुपरस्टार’चे स्क्रिनिंग आणि दिवाळी पार्ट्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत चालकाला काम करावं लागलं. आमिरच्या व्यग्र वेळापत्रकाचा फटका त्यालाही बसत होता. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आमिरने त्याला कार थांबवायला सांगितली. झोप उडण्यासाठी चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारून येण्यास त्याने सांगितलं.

वाचा : त्या प्रसंगी मला आत्महत्या करावीशी वाटली- कपिल शर्मा

काही दिवसांपूर्वी आमिर आणि त्याची पत्नी किरणला विमानतळावर सोडतानाही अशीच घटना घडली होती. झोपेअभावी त्यावेळीही चालक व्यवस्थित गाडी चालवू शकत नव्हता. त्यामुळे आता आमिर नव्या कारचालकाच्या शोधात असल्याचंही म्हटलं जात आहे.