बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर कोणता चित्रपट करणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू होते. त्याच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रश्नाचे उत्तर देत आमिर खानने सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक करणार असल्याची घोषणा आमिर खानने केली होती. ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने हा रिमेक प्रदर्शित होणार आहे.

आमिर खान चित्रपटांमधून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करत नाही तर, त्या माध्यमातून कायमच तो प्रेक्षकांना एक संदेश देतो. नकळतपणे प्रेक्षक आमिरच्या प्रत्येक भूमिकेशी जोडले जातात. या चित्रपटात आमीरसोबत करीना कपूर दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत आहेत. सध्या करीना लंडनमध्ये अंग्रेजी मीडियमचे शूटिंग करत असून ती एका रिऍलिटी शो साठी भारतात परत येणार आहे. भारतात आल्यानंतर ‘लाल सिंग चढ्ढा’चित्रपटात काम करायचे की नाही हे करीना ठरवणार आहे. जर करीनाने हा चित्रपट स्वीकारला तर, ती या चित्रपटात आमिरच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, ‘ही भूमिका करीनाने करावी अशी आमिरची इच्छा आहे. ऑगस्टपर्यंत करीना लंडनमध्ये असणार आहे. ती इथे आल्यानंतर चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी निर्णय घेण्यात येईल.’ आतापर्यंत ‘३ इडियट्स’, ‘तलाश’ अशा चित्रपटांमधून या जोडीची जादू अनुभवायला मिळाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिरच्याच ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन करणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नसली तरी साधारणपणे २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.