10 December 2019

News Flash

आमिरचे मोगुलमधील पुनरागमन धक्कादायक – गितीका त्यागी

आमिरच्या या निर्णयावर अभिनेत्री गितीका त्यागी हीने प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर मीटूचे आरोप झाल्यानंतर मोगुल चित्रपटातून माघार घेतलेल्या आमिर खानने पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री गितीका त्यागीने सुभाष कपूर यांच्यावर गैरवर्तणुकाचे आरोप केले होते. या आरोपानंतर आमिर खानने मोगुल चित्रपटातून माघार घेतली होती. या आरोपातून सुभाष कपूर यांच्यावरील आरोप खोटं असल्याचे समोर आल्यानंर आमिरने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या या निर्णयावर अभिनेत्री गितीका त्यागी हीने प्रश्न उपस्थित केले आहेत.

बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी आलेल्या ‘मी टू’ सारख्या क्रांतीकारक चळवळीनं अनेकांचे खरे चेहरे उघड झाले. या मोहीमेमुळे बॉलिवूडमधल्या अनेक बड्या दिग्दर्शकांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले. यात ‘मोगुल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांचाही समावेश होता. २०१४ मध्ये गितीका त्यागी या अभिनेत्रीने सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता, हे प्रकरण पुढे न्यायालयात देखील गेले. आमिरला ही बाब समजल्यानंतर त्याने पत्नीसह दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘मोगुल’ च्या निर्मितीवर टांगती तलवार होती. परंतु आता त्याने सुभाष कपूर यांच्या बरोबर काम करण्यास होकार दिल्याने अभिनेत्री गितीका त्यागी हीने आमिर खानच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गितीकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानच्या मोगुल चित्रपटाबाबत घेतलेल्या नव्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे. तिच्या मते आमिर खान हा एक प्रमाणिक माणूस आहे. तो स्त्रियांबरोबर अत्यंत आदरपूर्वक वर्तन करतो. बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या समस्यांवर उघडपणे बोलणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. परंतु ज्या दिग्दर्शकावर स्त्रियांच्या लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत, अशा व्यक्तिबरोबर काम करण्यास होकार दिल्याने तिला जबरदस्त धक्का बसला आहे. तिला आमिर खानकडून अशी अपेक्षा नव्हती असे तिने म्हटले आहे.

आमिर खानने दिलेले स्पष्टीकरण

आमिर खानने दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आमिरच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र सुभाष कपूर यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही त्यामुळे मोगुल चित्रपटात काम करण्यास होकार दिला अशा शब्दात आमिरने आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

First Published on September 11, 2019 5:00 pm

Web Title: aamir khan mogul geetika tyagi mppg 94
Just Now!
X