बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिरच्या दंगलची हवा अद्याप क्षमलेली दिसत नाही. चित्रपटाच्या व्यवसायामध्ये परदेशातील कमाईमध्ये आमिर खानने ‘रईस’ शाहरुख खानला पिछाडीवर टाकले आहे. शाहरुखच्या चित्रपटाला परदेशात मिळणारा भाव ओसरल्याचे दिसते. परदेशातील कमाईच्या पार्श्वभूमीवर सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर असून शाहरुखची तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘दंगल’ च्या यशामुळे आमिर परदेशी चित्रपट गृहात अधिक भाव मिळालेला अभिनेता ठरल्याचे दिसते. आमिरच्या तुलनेत शाहरुख खान फारच मागे पडला आहे. यापूर्वी परदेशी चित्रपटगृहामध्ये सलमान आणि आमिर खान यांच्यापेक्षा शाहरुख खानच्या चित्रपटांना अधिक भाव मिळायचा. मात्र सध्याच्या घडीला शाहरुखचा खेळ खल्लास करत आमिर आणि सलमान दोघेही त्याच्या पुढे निघून गेले आहेत.  शाहरुख खानच्या परदेशात चालणाऱ्या चित्रपटाबाबत बोलायचे तर, शाहरुखच्या चित्रपटांना परदेशातील प्रेक्षकांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. शाहरुखचा चित्रपट परदेशी खिडकीवर ५० ते ६५ कोटींची उलढाल करणार हे समीकरण असायचे. मात्र आता ही परिस्थिती राहिलेली नाही. चित्रपटगृहे आणि दर्शकांची वाढलेल्या संख्येमुळे शाहरुखच्या कमाईचे गणित बिघडल्याचे दिसते.

आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ आणि सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटांनी शाहरुखच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली, असे म्हणता येईल. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रतपटाच्या आधारे तिन्ही खानच्या कमाईवर नजर टाकल्यास शाहरुखचे वर्चस्व कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. दैनिक भास्करने दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी चित्रपटगृहात ‘दंगल’ चित्रपटाने ४.५ कोटी, ‘सुलतान’ कोटी तर ‘रईस’ने २ कोटींची कमाई केली आहे. अर्थातच व्यावसायिक कमाईच्या बाबतीत आमिरने ‘रईस’ शाहरुखला मागे टाकल्याचे दिसते. शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. मात्र सध्याच्या घडीला आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाची चलती आहे. परदेशातील चित्रपटातील कमाईसोबतच लोकप्रियतेमध्ये देखील आमिर आणि सलमान खानने बाजी मारली आहे. इंटरनेटवरील व्यवसायाचा विचार केल्यास तिन्हीं खान बरोबरीची टक्कर देताना दिसते.

आमिर खानच्या दंगलच्या यशाविषयी सांगायचे तर आमिरने नुकतीच दंगलच्या यशाची आणखी एक धमाकेदार पार्टी दिली. आमिरच्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावल्याचे दिसले. या पार्टीत  आमिरची मुलगी इरा खानसोबतच दंगलमधील आमिरच्या मुलींनी देखील हजेरी लावली होती. फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.