असहिष्णुतेच्या वक्तव्याबाबत वादाच्या भोव-यात सापडल्यानंतर आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. पंजाबमधील लुधियानात तो दाखल झालायं.

गेले दोन महिने आमिर लुधियानात ‘दंगल’चे चित्रीकरण करत होता. पण चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने आमिरला मुंबईत परतावे लागले होते. मात्र, त्यानंतर आमिरच्या अडचणीत अधिक वाढ झाली. सोमवारी आमिरने आपल्या पत्नीच्या मनातील भावना माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. त्यामुळे त्याला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण यासर्व गोष्टींकडे लुधियानावासियांनी दुर्लक्ष केले असून, त्याचे जोरदार स्वागत केले. आमिरच्या धर्मामुळे पंजाबच्या आदरातिथ्यात कधीच फरक पडणार नाही. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे हीच पंजाबची शान आहे, असे गुज्जरवाल येथील स्थानिक म्हणाले. हरिजीत सिंग यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमिर हा मुस्लिम आहे याचा आम्ही कधीही विचार केला नाही आणि करणारही नाही. तो आज पुन्हा लुधियानाला आला असून, आदरातिथ्यात काहीही बदल झालेला नाही. आम्हाला नाही माहिती काय वाद झाला आहे ते आणि त्याबाबत जाणून घेण्याची आम्हाला इच्छादेखील नाही. आपल्या घरीच आल्याची भावना आमिरच्या मनात यावी याकरिता आम्ही प्रयत्न करतोय.

गुज्जरवाल गावातील स्थानिक इतक्यावरच नाही थांबले तर त्यांनी आमिरची पत्नी किरणबरोबर आलेला अनुभवही सांगितला. पंजाबमधील प्रसिद्ध खाद्य सरसो का साग आणि मक्की रोटीचा किरणने आस्वाद घेतला होता.
img-20151124-wa0032
‘किरणजींना पंजाबमधले जेवण फार आवडले. त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले की त्या आमिरला आमच्या घरी घेऊन येतील. ज्या दिवशी किरण आमच्या घरी आल्या आम्ही आश्चर्यचकित झालो. त्या घरी येणार असल्याची काहीच कल्पना नसल्यामुळे आम्हाला ताजे घरगुती तूप तयार करता आले नाही. पण जेव्हा आमिर येईल तेव्हा माझी पत्नी त्याला नक्कीच घरगुती तुपाचा स्वाद चाखण्यास देईल’, असे रहिवासी कुक्कु फौजी म्हणाले.

आमिरने पंजाबला दाखल होण्यापूर्वी चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे पोहोचली होती. या टीमने चित्रपटासाठी हवे असलेले बदल गावात केले आहेत. यावेळी आम्ही काम करणा-या सर्व लोकांना लंगर दिले आणि हवी ती मदतही केली. आमच्या गावाची त्यांनी निवड केली हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे हरचेत सिंगजी म्हणाले.