‘पीके’या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या चित्रपटाने समीक्षकांची आणि चित्रपट रसिकांची पसंती मिळवली. त्याचबरोबर तथाकथित धर्मरक्षकांकडून या चित्रपटावर टीकेची झोड उठविण्यात आली. ‘पीके’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आमीर खानची कधीही न घेतलेली एक मुलाखत पाकिस्तानी संकेतस्थळांवर झळकू लागली. ‘डीएसके लिगल’मार्फत आमीर खानने या संकेतस्थळांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. याविषयी माहिती देताना ‘डीएसके लिगल’चे व्यवस्थापकीय भागीदार आनंद देसाई म्हणाले, कधीही न घेतलेल्या आमीर खानच्या सदर मुलाखतीत ‘पीके’भोवती उठलेल्या टीकेच्या वादळाचा फायदा घेत धर्माबाबतची काही वादग्रस्त विधाने आमीरच्या तोंडी घालण्यात आली आहेत. ‘पीके’शी संबंधित आमीर खानची ही मुलाखत खोटी असून, अनेक पाकिस्तानी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेली ही मुलाखत पाहून आमीरला प्रचंड धक्का बसला. अशा प्रकारची मुलाखत आमीरने कधीही कोणाला दिलेली नसून, कोणी तरी जाणूनबुजून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. कदाचित संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढविण्याचा उद्देशदेखील यामागे असू शकतो. कारण काहीही असले, तरी या सर्व प्रकारामुळे आमीर खानची नाहक बदनामी होत असल्याचे ते म्हणाले. आमीर खानतर्फे अशा संकेतस्थळांना नोटीस जारी करण्यात आली असून, आपल्या चारित्र्याचे रक्षण करणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. तो अबाधित न ठेवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. सध्या आमीर खान अमेरिकेत असून, मुंबईत परतल्यावर तो सदर प्रकरणाविरुद्ध मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देसाईंनी दिली.