बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. खुद्द आमिर खाननेच ही माहिती पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपचा सोहळा पुण्यात रंगला आहे. या कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव यांची अनुपस्थिती होती.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमिर खाननं या कार्यक्रमात येत या दोघांनी सगळ्या विजेत्यांना शुभेच्छा दिल्या तसंच यावेळी आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याचंही आमिरनं स्पष्ट केलं.

याच कार्यक्रमात आमिरनं त्याची पत्नी किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं सांगितलं. स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णाला आराम करण्याची आणि औषधं घेण्याची आवश्यकता असते. त्याचमुळे आपण पाणी फाऊंडेशच्या पुरस्कार वितरण  कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही असं आमिर खाननं म्हटलं आहे. तसंच सगळ्या विजेत्यांचे त्यानं आभारही मानले आहेत. या कार्यक्रमात आमिर खान ऐवजी आता शाहरूख खाननं हजेरी लावली आहे. आमिरनं आपला प्रतिनिधी म्हणून शाहरूख खानला या कार्यक्रमात पाठवलं आहे.  या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं खूप इच्छा होती पण आम्हाला स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही आणि आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे असंही या दोघांनी आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्हटलं आहे.

‘सत्यमेव जयते’ या आमिरच्या शोमधून आमिर खाननं आजवर अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यानंतर पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आमिर खाननं ‘वॉटर कप’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेलाही महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गावांना या योजनेचा फायदाही झाला, आता याच स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा सोहळा आज पुण्यात रंगला आहे. या कार्यक्रमात आमिर खान ऐवजी शाहरूख खान आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या मात्र आमिरनं आणि त्याच्या पत्नीनं म्हणजेच किरण रावनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वाईन फ्लू झाल्यानं कार्यक्रमात येऊ शकलो नसल्याचं स्पष्ट केलं.

सध्या देशभरात स्वाईन फ्लूचा कहर माजला आहे, २०१७ मध्ये जून महिन्याच्या अखेरपर्यंत १३ हजार १८८ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तर देशभरात स्वाईन फ्लूमुळे ६३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यू होण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. एच१ एन१ या विषाणूंमुळे स्वाईन फ्लू होतो. खरंतर हे विषाणू सुरूवातीला फक्त थंड हवेतच तग धरू शकत होते मात्र आता कडक उन्हाळा असो किंवा पावसाळी वातावरण असो भारतातल्या सगळ्या वातावरणाशी या विषाणूंनी जुळवून घेतलं आहे त्यामुळेच स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं आहे.

अभिनेते- अभिनेत्री हे अनेकदा आपल्या आरोग्याची खास काळजी घेताना दिसतात. तसंच त्यांच्या घरांबाबत किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबतही ते जागरूक असतात. मात्र आता अशा सेलिब्रिटीजनाही स्वाईन फ्लूची लागण होते आहे हे आमिर खान आणि किरण राव यांना झालेल्या स्वाईन फ्लूच्या उदाहरणावरून समोर आलं आहे.