हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांच्या नुसत्या नावानेच डोळ्यांसमोर एक प्रतिमा उभी राहते. बी टाऊनमधील असाच एक कलाकार म्हणजे आमिर खान. आमिर नेहमीच त्याच्या चित्रपटातील विविध भूमिकांनी प्रेक्षकांना थक्क करतो. त्याचे काही चित्रपट आणि एकंदर त्याचे संवादकौशल्य, वागण्याबोलण्याचा अंदाज सारंकाही परफेक्ट असल्यामुळे हा अभिनेता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी म्हणून तो तेवढीच मेहनतदेखील घेतो. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या एडिटिंगसाठी त्याने विशेष योजना आखली आहे.

प्रेक्षकांना सिनेमॅटोग्राफीचा अद्भुत अनुभव देण्यासाठी आमिर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दोन मोठे कलाकार या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून सध्या एडिटिंगचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या एडिटिंगसाठी ‘यशराज फिल्म्स’ने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
सर्वसाधारणपणे एखाद्या चित्रपटाचं एडिटिंग हे स्टुडिओत केलं जातं. मात्र, ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’चं एडिटिंग स्टुडिओत नव्हे तर प्रीव्ह्यू थिएटरमध्ये केलं जाणार आहे. मोठ्या पडद्यावर प्रत्येक दृश्य बारकाईने पाहता यावा आणि त्यातील प्रत्येक बारकावे टिपले जावे यासाठी थिएटरमध्ये याची एडिटिंग होणार आहे.

#JabariyaJodi : ही ‘जबरियाँ जोडी’ जिंकणार का प्रेक्षकांची मनं?

आमिरचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत मोठा चित्रपट मानला जात आहे. यामध्ये कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी आम्ही याची एडिटिंग प्रीव्हूय थिएटरमध्ये करत आहोत,’ असं दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य म्हणाले. तेव्हा आमिरचा हा फँटसी अॅक्शन अॅडवेंचर चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे येत्या दिवाळीतच स्पष्ट होईल.