‘दंगल’ सिनेमात देण्यात येणारा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे बॉलिवूडचा परफेक्टनिस्ट आमिर खानला वाटते. कुस्तीपटुच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा महिला सक्षमिकरणाचाही चांगला संदेश देतो. हाच या सिनेमाचा मुळ विषय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे प्रदर्शनाच्याआधी आमिरला हा सिनेमा करमुक्त व्हावा असे वाटत आहे.

इंडियनएक्सप्रेस डॉट कॉमशी केलेल्या बातचीतमध्ये आमिर म्हणाला की, ‘मला स्वतःला असं वाटतं की करमुक्त सिनेमांच्या नियमांमध्ये हा सिनेमा बसतो. त्यामुळे हा सिनेमा करमुक्त व्हावा असे मला वाटते. पण हा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही. राज्य सरकारनेच याचा निर्णय घेणे योग्य आहे. पण आम्ही दंगल करमुक्त व्हावा यासाठी मागणी करणार आहोत. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच आम्ही हे प्रयत्न करणार आहोत. पण ही सगळी एक प्रक्रिया आहे. कदाचित सिनेमा करमुक्त होईल किंवा होणारही नाही. या सगळ्या प्रक्रियेला कितीवेळ लागेल हे मी आत्ताच नाही सांगू शकत.’

तसेच लहान मुलांनाही हा सिनेमा पाहता यावा म्हणून सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला यु/ए प्रमाणपत्र न देता यु प्रमाणपत्र द्यावे असे आमिरला वाटते. इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमशी बोलताना तो म्हणाला की, ‘हा एक जागतिक दर्जाचा सिनेमा आहे. शिवाय एक कौटुंबक सिनेमाही आहे. या सिनेमातून लहान मुलांना खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच दंगलला यु प्रमाणपत्र मिळावे असेच आम्हाला वाटते.’

याशिवाय ‘दंगल’ सिनेमा लिक होऊन त्याचे पायरेटेड कॉपी निघण्याबद्दल आमिर म्हणाला की, ‘आम्ही आमच्याकडून अशी घटना घडू नये यासाठी होतील तेवढे प्रयत्न करणार आहोत.’ याशिवाय आमिरने प्रसारमाध्यमांसाठी दंगल सिनेमा कसा बनला याचे खास प्रसारण ठेवले होते. त्याने या सिनेमासाठी कसे वजन वाढवले आणि नंतर झपाट्याने कसे कमी केले याचे खास चित्रिकरण केले होते. हेच चित्रिकरण त्याने प्रसारमाध्यमांना दाखवले. याबद्दल अधिक बोलताना तो म्हणाला की, ‘नितिशला मी आधी तरुणपणीचा भाग चित्रित करावा आणि नंतर वजन वाढवावे असे वाटत होते. पण मी त्याला म्हटले की तसे केले तर वजन वाढवल्यानंतर माझ्याकडे ते कमी करण्यासाठी काहीच कारण उरणार नाही. म्हणून मी आधी वजन वाढवले आणि मग ते कमी केले.’