बॉलीवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान आज ५१ वर्षांचा झाला आहे. आज आमिरवर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्याचा भाऊ फैजल खान याने त्याच्या वाढदिवसासाठी काही खास योजना आखली आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सर्व कुटुंबिय एकत्र मिळून बर्थडे केक कापू आणि त्यानंतर डिनर करू. पण यावर्षी मी आमिरला एक खास भेट देणार आहे, असे फैजल इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमशी बोलताना म्हणाला. त्याने यावेळी आमिरविषयी ब-याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, प्रत्येक वाढदिवसाला आमिर काहीनाकाही संकल्प करीत असे, पण त्यानुसार वागण्यास तो अयशस्वी होई. दरवर्षी तो धूम्रपान सोडण्याचा संकल्प करतो. पण जेव्हा त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असतो त्यावेळी त्याच्या संकल्पावर पाणी फिरते. त्यामुळे यावर्षी तो सिगरेट सोडण्याच्या त्याच्या संकल्पावर कायम राहिल यावर मी लक्ष देणार आहे.
फैजल आमिरपेक्षा केवळ एकवर्षाने लहान आहे. त्यांच्या लहानपणीच्या बर्थडे पार्टीविषयी बोलताना तो म्हणाला की, आमचे पूर्ण घर रंगीबेरंगी पट्ट्या आणि फुग्यांनी सजवलेले असे. आम्हाला दोघांनाही फुग्यांचे फार वेड होते. त्यामुळे आमचे संपूर्ण घर, फर्निचर, पंखे हे फुग्यांनी सजवले जायचे. आमच्या सोसायटीमधली सर्व मुले वाढदिवसाला आली की आम्ही केक कापायचो. आमिरला लहानपणापासूनच पतंग उडवायला फार आवडते. मला आठवतं, आमिर त्याच्या एका वाढदिवसाला ‘मंगल पांडे’चे चित्रीकरण करत होता. त्यासाठी तो पाचगणीला गेलेला. त्याला आश्चर्यचकित करण्यासाठी मी काही पतंग घेऊन चित्रपटाच्या सेटवर पोहोचलो आणि आम्ही पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मी नेहमीच त्याला आमच्या लहानपणीच्या आठवणींना जोडलेली भेट देतो. आज जरी आमिर एक मोठा स्टार असला तरी फैजलसाठी तो प्रेमळ, काळजी घेणारा आणि नेहमीच संरक्षण करणारा असा भाऊ आहे. तो आज यशाच्या शिखरावर असला तरी एक व्यक्ती म्हणून त्याच्यात बदल झालेला नाही, असेही फैजल म्हणाला.
आमिरला खाण्याची फार आवड आहे. त्याला वाढदिवशी सिख कबाब खायला फार आवडतात. आमच्या आईने बनविलेले सिख कबाब तो फार आवडीने खातो. आमची आजी फार छान सिख कबाब बनवायची. तशीच चव आमच्या आईच्या हातालादेखील आहे, असे फैजल म्हणाला. फैजललासुद्धा चांगला स्वयंपाक करता येतो. त्याने आमिरसाठी एकदा चण्याचा हलवा बनवला होता. यावर्षीही तो एक खास डिश त्याच्यासाठी बनवणार आहे. नक्कीच ती आमिरला आवडेल.