‘वॉटर कप’ या अनोख्या स्पध्रेद्वारे महाराष्ट्रात ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीची चळवळ उभारणाऱ्या आमिर खान आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांची कथा ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमाद्वारे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिरने आपल्या ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून काही गावांची निवड केली. आणि तेथील गावकऱ्यांना पाणी वाचवण्यासाठीच्या तंत्रांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा उपयोग करत सदर गावकऱ्यांनी आपल्या गावाला दुष्काळातून मुक्त करायचे. अशा गावांना या ‘वॉटर कप’ स्पध्रेत सहभागी करून घेऊन सर्वोत्तम प्रयत्न करणाऱ्यांना हा कप देऊन सन्मानित करायचे असे या कामाचे स्वरूप आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधून ही स्पर्धा घेण्यात आली होती. यावर्षी तीस तालुक्यांतील १३०० गावांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यावेळच्या स्पध्रेचे वैशिष्टय़ म्हणजे मराठीतील प्रसिद्ध कलावंतांनी यावेळी महाराष्ट्रातील काही प्रांतांची जबाबदारी घेतली आहे. भारत गणेशपुरे-अनिता दाते विदर्भाचं, गिरीश कुलकर्णी-प्रतीक्षा लोणकर मराठवाडय़ाचं आणि सई ताम्हणकर-सुनील बर्वे पश्चिम  महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करणार आहेत. गावकऱ्यांनी दुष्काळमुक्तीसाठी केलेले प्रयत्न या ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. सामाजिक बदलाची गरज ओळखून आमिरने विविध समस्या हाती घेऊन त्यावर सुरू केलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचा शुभारंभ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर करण्यात आला होता. आता ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी उभे राहणारे कार्यही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘स्टार’ समूहाने पुढाकार घेतला आहे. ‘तुफान आलंया’ हा कायक्र्रम ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत दाखवण्यात येणार आहे