देशभरात नववर्षाच्या जल्लोषाचे वातावरण असताना बंगळुरुमध्ये महिलांसोबत झालेल्या छेडछाडीबद्दल बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानने संतप्त प्रतिक्रिया दिली. कायद्याची जरब नसल्यामुळे काहीजण अशी अमानवी कृत्ये करत असल्याचे आमिरने म्हटले .आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये सत्यमेव जयते वॉटर कपचा म्युझिक व्हिडीओ लाँन्च केला. यावेळी तो बोलत होता. तरुणींची छेडछाड करणाऱ्यांच्या मनामध्ये आपल्याला फार मोठी शिक्षा होणार नाही, अशी भावना आहे. त्यामुळे अशा घटनानंतर तात्काळ आणि कठोर शिक्षा करुन त्यांना धडा शिकवायला हवा, असेही तो म्हणाला. महिलांसोबत घडणाऱ्या अशा घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्राने मिळून  पुढाकार घ्यावा, असेही आमिर खानने म्हटले आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिरची स्तुती केली. आमिर खान हा हनुमानासारखा आहे, त्याला फक्त त्याच्या ताकदीची आणि क्षमतांची जाणीव करून द्यावी लागते, असे ते म्हणाले.

बंगळुरुच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली होती. या प्रकारास पाश्चात्य आचार-विचार जबाबदार असल्याचे वक्तव्य कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी केले होते. तर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु असिम आझमी यांनीही महिलांनी परिधान केलेले शॉर्ट ड्रेस या घटनेला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. जितकी नग्नता तितकी फॅशन जास्त, असे महिलांना वाटते असेही आझमी म्हणाले होते.
बंगळुरू येथील ब्रिगेड रोड आणि एम. जी. रोडच्या जंक्शनवर नववर्षाच्या पार्टीत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असतानाही काही महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.

 

या घटनेनंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. ‘हे चांगले नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही. असे कार्यक्रम- समारंभ कशा पद्धतीने पार पाडावेत, याचा विचार करायला हवा. आपल्याकडे दहा हजार पोलिस नाहीत’, असे ते म्हणाले होते. तसेच पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनी पाश्चात्यांचे अनुकरण केले होते. केवळ विचारांचेच नव्हे, तर पोषाखांचेही, असे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता.