बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटाच्या पोस्टरपासून ते चित्रपटात धार्मिक गोष्टींवर करण्यात आलेल्या भाष्यामुळे हा चित्रपट चांगलाच वादात सापडला होता. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करत ‘पीके’ने जगभरात आतापर्यंत ४३३ कोटींची कमाई केली असून, भारतामधील या चित्रपटाची कमाई २४६ कोटी इतकी आहे. यापूर्वी शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट ४२२ कोटींसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला होता. त्यानंतर आमिरच्याच ‘धूम-३’ ने ५४२ कोटींची कमाई करत ‘चेन्नई एक्सप्रेस’ला मागे टाकले होते. मात्र, आता आमिरच्या दुसऱ्या चित्रपटानेही चेन्नई एक्सप्रेसला मागे टाकण्याची कामगिरी केली आहे. ‘पीके’ हा लवकरच धूम-३ ला देखीलमागे टाकेल असा अंदाज आहे. केवळ अकरा दिवसांत ‘पीके’ने भारतात २४६ कोटींची कमाई केली आहे.
त्यामुळे बॉलिवूडमधील चित्रपटांच्या कमाईचे मुल्यमापन करायचे झाल्यास, आघाडीच्या पाच चित्रपटांत आमिर खानच्या तीन चित्रपटांचा दबदबा आहे. बॉक्स ऑफिसच्या जाणकारांनुसार ‘पीके’ची भारतातील कमाई ३०० कोटींपर्यत जाण्याची शक्यता आहे.