News Flash

‘आमने सामने’ : लग्न अन् लिव्ह-इन्ची रंजक शल्यचिकित्सा

विवाहसंस्थेतील काच व बंधनं त्यांना नकोशी वाटू लागली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र पाथरे

लग्नसंस्थेतील उणिवा व दोषांपायी आधुनिक विचाराच्या मंडळींचा त्यावरील विश्वास उडाला आहे. विवाहसंस्थेतील काच व बंधनं त्यांना नकोशी वाटू लागली आहेत. त्यातलं गच्च बांधलेपण, स्व-अवकाशाचा होणारा संकोच, अभिव्यक्तीवर येणाऱ्या मर्यादा, अनावश्यक जबाबदाऱ्यांचं ओझं हे सारं टाळून असं एखादं नातं का निर्माण करता येऊ नये, या विचारांतून मग ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’चा पर्याय पुढे आला. आपला जोडीदार सर्व बाबतींत आपल्या बरोबरीचा असावा, हाही त्यामागचा एक विचार. संभाव्य जोडीदाराला सर्वार्थानं पारखून घेण्यासाठी आणि व्यक्ती म्हणून आपलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपण्यासाठी लिव्ह-इन् रिलेशनशिपकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. या नात्यात कुणी कुणाला बांधील असत नाही.. अन् उत्तरदायीदेखील! एकमेकांचं जमलं तर उत्तमच. नाहीच जमलं तर आपापला मार्ग मोकळा. या संबंधांत एकमेकांच्या पायांत पाय अडकवणं असत नाही. त्यामुळे नाही पटलं तर घटस्फोटासाठी रखडणंही होत नाही. जो-तो आपला मुखत्यार.

याउलट, लग्न म्हणजे केवळ जोडीदाराशीच जुळवून घेणं नसतं, तर त्याच्या घरादाराशी, नातलगांशी, आप्तमित्रांशीही जमवून घ्यावं लागतं. त्यातून मग परस्परांचे स्वभाव, आचारविचार, आवडीनिवडी, प्राधान्यक्रम या सगळ्या गोष्टींशी तडजोड करणं आलंच. तेही आपल्याला पटो वा न पटो. बरं, हे फक्त जोडीदाराच्या बाबतीतच करावं लागलं तर एक वेळ ठीक आहे. पण इतक्या सगळ्या गोष्टींशी पूर्णपणे भिन्न सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या मुलीला नाइलाजानं जुळवून घ्यावं लागतं. तशात तिचीही वेगळी घडण झालेली असते. मानसिकता वेगळी असते. खरं तर तिनेही आपला जोडीदार, संसार याबद्दल काही स्वप्नं पाहिलेली असतात. ती अशा तडजोडींपायी धुळीला मिळाली की पुढे सारं आयुष्य तिला कुढत काढावं लागतं. कधी कधी या घुसमटीचा स्फोट होऊन संसार उद्ध्वस्त होण्याचीही पाळी येते. भारतीय कुटुंबव्यवस्थेत घटस्फोट ही गोष्टही तितकीशी सोपी नाही. अनेक दबावांशी सामना करत तो घ्यावा लागतो. त्यापश्चात पुन्हा नव्यानं आयुष्याला सामोरं जाणं हे तर त्याहूनही कठीण. म्हणून अनेक विजोड जोडपी नाइलाजाने संसार रेटत राहतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था वरकरणी तगून राहिली तरी आतून ती पोखरलेली असते. अर्थात संसार म्हटलं की तडजोड आलीच. ती ना पुरुषाला चुकत, ना स्त्रीला. हं.. आता स्त्रियांना अधिक तडजोडी कराव्या लागतात, हे मात्र खरंय. पण उठसूठ या ना त्या कारणास्तव घरात वादंग झाला म्हणून घटस्फोट घेणं शक्य नसतं. आणि ते योग्यही नाही.

मग लग्नसंस्थेतील या घुसमटीवर उपाय काय?

तर.. लिव्ह-इन् रिलेशनशिपचा मार्ग पत्करून जोडीदार पारखून घेणं!

बरं, हा तरी फुलप्रूफ पर्याय आहे का? तर.. नाही! त्यातही अनेक त्रुटी, दोष, धोके संभवतात. आणि कितीही नाकाला जीभ लावली तरी या नात्यातसुद्धा काही अंशी तडजोड करावी लागतेच! कधी कधी तोंड दाबून बुक्क्य़ांचा मारही सहन करावा लागतो. पण त्याबद्दल जाहीरपणे बोंब मारण्याची मात्र चोरी. कारण संबंधितांनी डोकं शाबूत ठेवून हा मार्ग स्वीकारलेला असतो ना!

या नात्यातला सर्वात मोठा धोका म्हणजे ही ‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर मेथड’ किती काळ आणि किती जोडीदारांवर वापरून पाहणार? ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’कडे शुद्ध व्यवहार म्हणून पाहायचं म्हटलं तरी या व्यवहारात दोन जिवंत, उत्कट संवेदना असलेली हाडामांसाची माणसं गुंतलेली असतात. त्यामुळे भावनिक, मानसिक व शारीरिक गुंतणूक हा फार मोठा कळीचा मुद्दा याही नात्यात विचारात घ्यावाच लागतो. तो नजरेआड करून चालणारे नाही. त्यात दोन भिन्न व्यक्तींच्या ‘गरजा’ या एकसमान कशा असतील? त्यामुळे या जगात परस्परांना पूर्णपणे ‘मॅच’ होतील अशी स्त्री-पुरुषाची जोडी सापडणं अशक्यच. म्हणजे मग या नात्यातही तडजोडीची तयारी ठेवावी लागतेच. आणि एकमेकांची ‘कॉम्पेटिबिलिटी’ तपासायची तर त्याचे ‘आदर्श’ निकष कोणते? आणि ते कुणी व कशाच्या आधारे ठरवायचे? दोन भिन्न व्यक्तींसाठी ते वेगवेगळे असू शकतात. नव्हे, असतातच. मग या ‘चाचणी’तून काय सिद्ध होणार?

‘आदर्श’ लग्न तसंच ‘लिव्ह-इन्’सारखे सहजीवनाचे अनेक पर्याय कालौघात चाचपले जात आहेत. त्यासंबंधी विचारविमर्श, चर्चा, वितंडवाद होत आहेत. मात्र, अद्यापि कुठलाही पर्याय दोष व त्रुटीरहित असल्याचं सिद्ध झालेलं नाही.. होण्याची शक्यताही नाही. कारण हे गणित नाहीए.

तर.. स्त्री-पुरुष सहजीवनाच्या मार्गाची चिकित्सा करणाऱ्या असंख्य कलाकृती आजवर जन्माला आल्या आहेत. नुकतेच रंगमंचावर आलेलं ‘आमने सामने’ हे नीरज शिरवईकर लिखित-दिग्दर्शित नाटक याच पठडीतलं आहे. अनंतराव आणि निलीमा ताई हे प्रौढ दाम्पत्य आपल्या मालकीच्या एका जादा फ्लॅटमध्ये भाडोत्री ठेवून पैसे मिळवण्याचं ठरवतात. मात्र, अनंतरावांची त्यासाठी एक अट असते : ते केवळ लग्न झालेल्या दाम्पत्यालाच फ्लॅट भाडय़ाने देणार असतात. समीरा पाटकर आणि साहिल गुजर हे नवीन लग्न झालेलं (?) जोडपं त्यांच्याकडे घर भाडय़ाने घ्यायला येतं. अनंतरावांना आनंद होतो. आपल्याला एक चांगला शेजारी मिळेल आणि वर दोन पैसेही मिळतील, हा त्यांचा साधा हिशेब असतो. पण त्या दोघांच्या वेगवेगळ्या आडनावांनी ते गोंधळात पडतात. मात्र, दोघं थातुरमातुर कारणं सांगून वेळ निभावून नेतात. अनंतरावांची पत्नी नीलिमा त्यांना या नस्त्या भानगडींत नाक खुपसल्याबद्दल चांगलंच सुनावते. पण ते मात्र आपला हेका सोडत नाहीत. हळूहळू त्यांना एकेक गोष्टी उलगडत जातात. या तरुण जोडप्यात सगळं काही आलबेल नाहीये, हेसुद्धा! नीलिमा अनंतरावांना त्याकडे काणाडोळा करायचा सल्ला देते. पण घरमालक आणि शेजारी म्हणून आपली काहीएक जबाबदारी आहे असं मानणाऱ्या अनंतरावांना त्यांच्या घरगुती मामल्यांत दखल घेतल्याविना राहवत नाही. साहिल-समीराचं लग्न झालेलं नाही हेही त्यांना एव्हाना कळलेलं असतं. ती दोघं लिव्ह-इन् रिलेशनशिपमध्ये असतात. एवढय़ा तेवढय़ा गोष्टीवरून दोघांत रोज तणातणी होत असते. हा बेबनाव वाढत जातो. अनंतरावांना त्यांच्यातली ही रोजची भांडणं आवडत नाहीत. या दोघांना काहीही करून लग्नाच्या बेडीत अडकवायचंच, या ध्येयाने ते पछाडतात. त्यासाठी ते नाना कल्पना लढवतात. पण तरी त्यांच्यातली दरी कमी होत नाहीच. शेवटी दोघं आपापल्या मार्गानं जायचं ठरवतात. समीरा घर सोडून जाते. त्यावरून साहिलला अनंतराव चांगलेच फैलावर घेतात. त्यावेळी साहिल त्यांना एकच प्रश्न विचारतो : तुमच्या एवढय़ा वर्षांच्या संसारात नीलिमाताई खरोखरीच सुखी आहेत का?

आणि आपल्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या अनुषंगानेच साहिल अनंतराव व नीलिमाताईंच्या संसाराची क्ष-किरणीय उलटतपासणी करतो. या चाचणीत काय आढळतं? लग्न करण्यानेच माणसं ‘सुखी’ होतात का? ‘लिव्ह-इन’मध्ये तरी जोडप्याला अपेक्षित अवकाश, स्वातंत्र्य आणि सुख लाभतं का?

नीरज शिरवईकर यांनी या बेतीव, पण गंभीर विषयावरचं नाटक सादर करताना ते रंजक कसं होईल याचीही खबरदारी घेतली आहे. या नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे दोन अंक हे दोन स्वतंत्र ‘चित्रं’ प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी योजले आहेत. पहिल्या अंकात समीरा-साहिलच्या ‘लिव्ह-इन्’चं चित्र चितारलं जातं. तर दुसऱ्या अंकात अनंतराव-नीलिमाताई या ‘विवाहित’ जोडप्याचं संसारचित्र समोर येतं.  प्रसंग तेच, पण त्या वेळी या दोन घरांतील सिच्युएशन्स मात्र वेगळ्या असतात. लेखक दोन सहजीवन पद्धतींची चिकित्सा नाटकात करू पाहतो. तथापि पहिल्या अंकात ‘लिव्ह इन्’मधील ताणतणाव ‘टिपिकल’ दाखवले आहेत. त्यांत नवा मुद्दा काहीच नाहीए. विचार व आचारातलं द्वंद्वही त्यातून सच्चेपणाने बाहेर येत नाही. साहिल आणि समीरा आपल्या ‘लिव्ह-इन्’ निर्णयाबाबतीत काहीसे अपरिपक्व असल्याचंच त्यातून दिसून येतं.

याउलट, दुसऱ्या अंकात ‘विवाहित’ अनंतराव आणि नीलिमाताई यांच्या वरकरणी ‘सुखी’ संसारातील अदृश्य ताण अधिक वास्तवदर्शीपणे आले आहेत. उभयतांतली नि:शब्द, परंतु बोलकी अस्वस्थता, बेचैनी जास्त सखोलतेनं समोर येते. अर्थात मंगेश कदम आणि लीना भागवत या कलावंतांच्या परिपक्व अभिनयाचाही यात मोलाचा वाटा आहे. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे साथीदार असण्याचा ‘अनुभव’ त्यांना पती-पत्नीची ‘भूमिका’ साकारताना उपयोगी पडले असावेत.

लेखकाने नाटकात घडलेले घटना-प्रसंग आणि त्यांचे दोन घरांत उमटलेले विरोधी पडसाद आलटून पालटून दाखविण्याची वापरलेली युगत फर्मास आहे. त्याने नाटकाला एक वेगळेपण प्राप्त झालं आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनीही संहितेस अनुषंगून समोरासमोरच्या दोन घरांची केलेली योजना, मधला लिफ्टचा पॅसेज आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्धात त्यांची केलेली अदलाबदल या प्रयोगाला आगळे परिमाण देणारं ठरलं आहे. रवी करमरकरांनी प्रकाशयोजनेतून दोन घरांतल्या विभिन्न वातावरणाचा ‘फील’ दिला आहे. विजय गवंडे (पाश्र्वसंगीत), अमिता खोपकर (वेशभूषा) आणि अभय मोहिते (रंगभूषा) यांनीही नाटकाचा मूड अचूक हेरला आहे.

मंगेश कदम (अनंतराव) आणि लीना भागवत (नीलिमाताई) यांची विनोदाची सूक्ष्म जाण व परिपक्व अभिनय यामुळे नाटय़विषय जरी गंभीर असला तरीही त्याला हसतंखेळतं रूप लाभलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील ताण, नि:शब्द संवाद/विसंवाद, तिरकं बोलण्यातून आपल्याला हवा तो परिणाम साध्य करण्याचं त्यांचं कौशल्य अशा साऱ्या गोष्टी या दोघांनीही अत्यंत बारकाव्यांनिशी अभिव्यक्त केल्या आहेत. त्यांची रंगमंचीय केमिस्ट्री अफलातून आहे. मधुरा देशपांडे (समीरा) आणि रोहन गुजर (साहिल) यांना ‘लिव्ह-इन्’ नात्यातील वैचारिकता ठामपणे पेलता आलेली नाही. अर्थात यात त्यांचा दोष नाहीए. मूळ संहितेतच या गोष्टीचा नीट विचार झालेला नाही. लिव्ह-इन् रिलेशनशिपच्या समर्थनार्थ जे मुद्दे आजवर मांडले गेले आहेत तेच पुन:पुन्हा मांडण्याने काही साध्य होत नाही. त्यामागे ठाम वैचारिक बैठक आणि आचारातील प्रगल्भताही आवश्यक आहे. (जी दिवंगत कवयित्री अमृता प्रीतम आणि चित्रकार इमरोज यांच्या नात्यात आढळून येते.) ती नसेल तर त्या मांडणीला गांभीर्य प्राप्त होत नाही. ‘आमने सामने’मध्ये नेमका हाच घोळ झाला आहे. र्अधकच्च्या वयातलं प्रेमाकर्षण यापलीकडे समीरा-साहिलचं नातं प्रस्थापित होत नाही. समीराची व्यक्तिस्वातंत्र्याची पोपटपंची ठाशीव कृतीविना अनाठायी वाटते. असो. परंतु एकंदरीत वेगळ्या सादरीकरणामुळे हे नाटक लक्षवेधी ठरतं, हे मात्र खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:25 am

Web Title: aamne samne marathi natak review abn 97
Next Stories
1 चित्ररंग : रुपेरी पडद्यावरही मोहीम फत्ते!
2 वेबवाला : मर्यादित चौकटीत, मर्यादित यश
3 भुताळी सहल..
Just Now!
X