पूर्वी परदेशात फार कमी चित्रपटांचे चित्रीकरण होत असे. परंतु प्रेक्षकांची जगभरातील प्रेक्षणीय स्थळं बघण्याची उत्सुकता लक्षात घेऊन अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात करू लागले. प्रेक्षकांना पडद्यावर नयनरम्य दृश्ये दिसत असली तरी ती चित्रित करताना आलेल्या अडचणींबाबत ते अनभिज्ञ असतात. आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन‘ बहुतांशपणे फ्रान्समधील पॅरिस इथं चित्रित झाला आहे व त्या शहराचे व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम चित्र या चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे. परंतु तिथे शूट करताना कलाकार व तंत्रज्ञांना बरेच कष्ट घ्यावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोप तसा थंड हवेचा प्रदेश. तिथल्या उन्हाळ्यातही उष्ण प्रदेशातील लोकांना थंडी वाजू शकेल. ‘आरॉन’ चित्रपटाच्या क्रू मध्ये तब्बल ८०% तंत्रज्ञ फ्रेंच होते. काही भागांचे चित्रीकरण उणे ४ अंश तापमानात झाले. तिथल्या लोकांना थंड हवामानाची सवय होती परंतु भारतीय तंत्रज्ञ आणि कलाकार यांना त्या तापमानात शूटिंग करणे अवघड जात होते. परंतु तिथल्या लोकांनी आपल्या लोकांची विशेष काळजी घेतली व आपल्या कलाकारांनीदेखील जिद्दीने चित्रीकरण पूर्ण केले.

या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे विविध देशांतील कलावंतांनी साकारलेला हा मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रपट गावातून शहरात आला आणि आता परदेशातही चित्रित होऊ लागलाय. चिमूटभर खर्चबंधन असलेले मराठी चित्रपट आता कोटींच्या घरात निर्मितीखर्च करीत आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटाचं थोडंफार चित्रण परदेशात होऊ लागलंय. आगामी चित्रपट ‘आरॉन‘ पहिला मराठी चित्रपट आहे जो मुख्यत्वे परदेशात चित्रीत झालाय. तसेच या चित्रपटाबरोबर विविध देशांतील सहा जण जोडली गेली आहेत.

‘आरॉन’ हे एक फ्रेंच नाव आहे आणि या चित्रपटाचा संबंध फ्रान्सशी आहे. इतकेच नव्हे तर या मराठी चित्रपटाचा संबंध एकूण सहा देशांशी आहे. फ्रान्स, रोमेनिया, इस्रायल, कॅनडा, हंगेरी आणि अर्थातच भारत. त्याचप्रमाणे बहुतांश पॅरिसमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात कॅनेडियन, फ्रेंच आणि भारतीय कलाकार आहेत. ‘जिएनपी फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaron marathi movie that will take you on a journey around six nationalities
First published on: 16-11-2018 at 11:58 IST