‘बधाई हो’, ‘अंधाधुन’ अशा सुपरहिट चित्रपटांमुळे अभिनेता आयुषमान खुरानाची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आयुषमानच्या ‘आर्टिकल १५’ या आगामी चित्रपटाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. दलित समाजावर होणारे अन्याय ट्रेलरमध्ये दिसतात. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या जातीय भेदभाववरून समाजात होणाऱ्या भीषण घटना बघून अंगावर काटा उभा राहतो. उत्तर प्रदेशातील येथे पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा यात दिसते. २७ मे २०१४ रोजी ही घटना घडली होती. चित्रपट निर्मात्यांनी पाच वर्षांनी म्हणजेच २७ मे २०१९ रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता.

चित्रपटाच्या ट्रेलर व टीझरमध्ये आयुषमान संविधानातील काही गोष्टींची आठवण करून देताना दिसतो. धर्म, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारे राज्य आपल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करू शकत नाही, असे त्याने टीझरच्या सुरुवातीला म्हटले आहे. चित्रपटात आयुषमाने पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे.‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लाएंगे’ अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे.

चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर बरेच प्रश्न मनात निर्माण होतात, या प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमधून मिळतील की नाही हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी या संबंधीची एक पोस्ट आयुषमानने शेअर केली असून ‘या व इतर चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये फरक आहे. तुम्ही तयार आहेत का या फरकाची सुरुवात करायला?’ असं त्याने म्हटलं आहे. यासोबतच आयुषमानने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये सुरुवातीचे आठ सेकंद ट्रेलर दिसतो आणि मग अचानक आयुषमान येऊन म्हणतो की, “हा व्हिडीओ बघण्याची तुमची लायकी नाही.हा भेदभाव बघून वाईट वाटलं ना? भारतात अनेकजण रोज असा भेदभाव सहन करतात. या भेदभावाच्या अंताची सुरुवात करूया.”

https://www.instagram.com/p/ByEsUR0ADbL

‘आर्टिकल १५’ आयुषमानसोबत ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.