सध्या संपूर्ण देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढत्या करोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं आणि भितीचं वातावरण निर्माण झालंय. अशात लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून विविध पोस्ट शेअर करत आहेत. तसचं अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. अशाच अभिनेता आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

आयुष्यमानची पत्नी ताहिराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात सध्याच्या काळात सगळ्यांनी मजबूत राहण्याची गरज असल्याचं ती म्हणालीय. ती म्हणाली, ” माझ्या आत यावेळी खूप राग, खूप अस्वस्थता आणि खूप दु:ख दडलेलं आहे. कधी कधी मला स्वत:ला सांभांळणं कठीण होतं. मी या सर्व गोष्टी कधी सोशल मीडियावर शेअर नाही केल्या मात्र आज मी माझ्या मनातलं इथे शेअर करतेय.”

पुढे ती म्हणाली, ” आपण सर्व ज्या परिस्थितीचा सामना करतोय त्याचं मला अतिशय दु:ख होतंय. मी कितीही म्हणाले की मी तुमचं दु:ख समजू शकते मात्र प्रत्यक्षाच तसं नाहीय मला कधीही तुमचं दु:ख समजणं कठीण आहे. काही दु:ख आणि यातना या शारीरिक असतात तर काही मानसिक अशात यात सर्वात जास्त वेदनादायी काय याची तुलना मी कधीच करू शकत नाही. हे युद्ध सुरूय आणि आपण एका प्रकारे अनेक सैनिक गमावले आहेत. फक्त देवाचं स्मरण करा. ” असं ती म्हणाली.

वाचा: फॅशन डिझाइनर्सने कंगनासोबत करार तोडल्यानंतर बहिण रंगोली संतापली; “हे छोटे डिझायनर..”

ताहिराने हा व्हिडीओ शेअर करत सध्याच्या काळात एकत्र येत एकमेकांची मदत करणं गरजेचं असल्यांच सांगितलं आहे. या आधी ताहिराने कॅन्सर सारख्या आजारावर मात केलीय. या काळातही तिने सकारात्मकता कमी होऊ दिली नाही.