‘ओय लकी लकी ओय’ चित्रपटात आपल्या चलाखीने गाड्या चोरून त्या इतरांना विकून लाखांचा गंडा घालणाऱयाची भूमिका केलेल्या अभिनेता अभय देओलचीच आता ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार काल गुरूवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून चोरीला गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय देओलच्या सांताक्रूझ येथील मधूबन सोसायटी परिसरातून एसयूव्ही कार चोरीस गेली आहे. बुधवारी अभयने सदर कार आपल्या सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी केली होती. मात्र, दुसऱया दिवशी कार तिथे नव्हती. कार चोरीला गेल्याची तक्रार अभयने पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
२००८ साली ‘पजारो’ ही १२ लाखांची एसयूव्ही कार अभय देओलने खरेदी केली होती. इमारतीच्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, अभयची कार मध्यरात्रीपर्यंत आहे त्या जागी व्यवस्थित होती. त्यानुसार ही कार मध्यरात्रीनंतर चोरीला गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.