बॉलिवूड कलाकारांच्या मांदियाळीमध्ये आपलंही नाव असावं असं अनेक तरुण-तरुणींना वाटतं. त्यामुळे हे स्वप्न उराशी कवटाळून अनेक जण या मायानगरीमध्ये येतात. परंतु फार कमी जणांचं हे स्वप्न पूर्ण होतं. तसंच काहीसं अभय वर्मा या तरुणासोबत झालं आहे. एका चॉकलेटच्या जाहिरातीमध्ये झळकलेल्या मुलाच्या पदरामध्ये थेट संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पडतो. इतकंच नाही तर कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या या तरुणाला थेट पंतप्रधान मोदींची भूमिका साकारण्याची संधी मिळते.

काही दिवसापूर्वी चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मन बैरागी’ या चित्रपटाची ते निर्मिती करत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून पोस्टरवर झळकलेला मुलगा नक्की कोण आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

या चित्रपटामध्ये मोदींच्या किशोरावस्थेतील भूमिका साकारण्याची संधी अभय वर्मा या तरुणाला मिळाली असून अभय हा अनेक जाहिरातींमध्ये झळकलेला आहे. या जाहिरातींपैकी त्याची कॅडबरी डेरीमिल्कची जाहिरात विशेष लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या जाहिरातीमुळे त्याला ‘नैना दा क्या कसूर’ या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली. त्यातच हे गाणं संजय लिला भन्साळी यांनी पाहिलं आणि पाहताच क्षणी त्यांनी ‘मन बैरागी’साठी अभयला घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, करिअरच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींची भूमिका करायला मिळणं हे कोणत्याही कलाकारासाठी आनंदाची बाब आहे. ‘मन बैरागी’ हा चित्रपट केवळ एक तासांचा असून यामध्ये मोदींच्या जीवनातील न पाहिलेले अनेक क्षण पडद्यावर साकारण्यात येणार आहे.