‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेने सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात एका पोस्ट लिहिली आहे. यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही, असं म्हणत तिने ट्रोलर्सना थेट कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

काय आहे अभिज्ञाची पोस्ट?

‘आता पुरे झालं. दिवसेंदिवस सायबर क्राइमची प्रकरणं वाढत आहेत. विविध कारणांसाठी मलासुद्धा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. पण यापुढे माझ्या पोस्टवर येणाऱ्या प्रत्येक खोट्या, अश्लील, बेजबाबदार कमेंटविरोधात मी कायदेशीर तक्रार करणार आहे. यामध्ये स्पॅममध्ये येणाऱ्या मेसेजेसचाही समावेश असेल. आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून वाटेल ते बोललं जातं. लोकांना जे योग्य वाटतं त्या हिशोबाने आम्ही वागलं पाहिजे असं त्यांना वाटतं. खरी परिस्थिती काय आहे हे जे जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. लोकांच्या हिशोबाने नाही वागलो तर आम्हाला बेजबाबदार म्हटलं जातं किंवा कलाकार आहात म्हणून काहीपण करायचं, कलाकार असल्याचा माज आहे असं काही बोललं जातं.’

‘सेलिब्रिटी होण्याआधी मी एक सामान्य व्यक्ती आहे. जी १० वर्षांपूर्वीसुद्धा सामान्य होती आणि पुढे आयुष्यभर तशीच राहील. माझ्या खासगी किंवा व्यावसायिक आयुष्याशी संबंधित निर्णयांवर टिप्पणी करण्याचा किंवा ते योग्य-अयोग्य ठरवण्याचा दुसऱ्या कोणाला अधिकार नाही. जे वाईट टिप्पणी करत नाहीत त्यांना विनंती आणि जे करतात त्यांना यापुढे कुठल्याही चुकीला माफी नाही.’, असं अभिज्ञाने ठामपणे म्हटलंय.

सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेसुद्धा आहेत. अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून, त्यांच्या फोटोंवरून अनेकदा वाईट टिप्पणी केली जाते. याविरोधात अभिज्ञाने आवाज उठवला आहे.