22 November 2019

News Flash

‘बिग बॉस’च्या घरातून अभिजीत बिचुकलेंना अटक

'बिग बॉस मराठी २'च्या पहिल्या दिवसापासूनच बिचुकले चर्चेत आहेत.

अभिजीत बिचुकले

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी त्यांना बिग बॉसच्या घरातूनच अटक झाली आहे. आरे पोलिसांच्या मदतीने सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेंना अटक केली आहे.

चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टाने बिचुकलेंविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेत अटकेची कारवाई केली आहे. बिचुकलेंना उद्या सातारा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की त्याचा प्रवास इथेच संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉसच्या घरातील वाद

अभिजीत बिचुकले स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये त्याची व अभिनेत्री रुपाली भोसलेची वादावादी झाली होती.

घरातल्या सदस्यांना १ ते १० या क्रमांकांवर उभं राहण्याचा टास्क दिला. अभिजित केळकर पहिल्या क्रमांकावर जाऊन उभा राहिला. किशोरी शहाणे दुसऱ्या क्रमांकावर जाऊन उभ्या राहिल्या. नेहा शितोळे तिसऱ्या तर अभिजित बिचुकले चौथ्या स्थानावर जाऊन उभे राहिले. प्रत्येकाने आपण कोणता क्रमांक का निवडला आहे याचे स्पष्टीकरण द्यायचे होते. रुपाली भोसलेला सातव्या क्रमांकावर उभे रहावे लागल्याने तिने सगळा राग बिचुकलेंवर काढला. ते कसं खोटं बोलले, त्यांनी इतरांची फसवणूक कशी केली हे सांगायला सुरूवात केली. मात्र बिचुकलेंनी आरोप फेटाळले, ज्यानंतर रूपाली भोसलेने बिचुकलेंना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर तिळपापड झालेल्या बिचुकलेंनी रूपाली भोसलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिव्यांचा भडीमार करतानाच त्यांनी चौथा क्रमांक सोडला जो रूपाली भोसलेने पटकावला.

याच सगळ्या प्रकारावरून भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

First Published on June 21, 2019 2:17 pm

Web Title: abhijeet bichukale arrested from bigg boss marathi house ssv 92
Just Now!
X