‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी मुंबईतून अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला जमीन मिळाला मात्र २०१२ सालच्या एका खंडणी प्रकरणात न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्याविरोधात सातारा जिल्हा न्यायालयात न्या. आवटी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित राहिल्यानंतर न्या आवटी यांनी याप्रकरणी अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली होती.

त्याला अटक करून सातार्‍याला आणण्यात आले. त्याच्या छातीत दुखू लागल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. चेक बाऊन्स प्रकरणात १५ हजाराच्या जात मुचलक्यावर त्याची जमीनावर मुक्तता करण्यात आली.

मात्र त्याच्यावर २०१२ साली सातारा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला ताब्यात देण्याची व पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. त्याला जमीन द्यावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.॰ सोमवारी जिल्हा न्यायालयात पुन्हा जामीन मागण्यात येईल असे त्याच्या वकिलांनी संगितले. त्यामुळे सोमवारपर्यंत तरी त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. माझ्यावरील हा गुन्हा म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्याने पत्रकारांना संगितले.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.

बिग बॉसच्या घरातील वाद

अभिजीत बिचुकले स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये त्याची व अभिनेत्री रुपाली भोसलेची वादावादी झाली होती.

घरातल्या सदस्यांना १ ते १० या क्रमांकांवर उभे राहण्याचा टास्क दिला. अभिजित केळकर पहिल्या क्रमांकावर जाऊन उभा राहिला. किशोरी शहाणे दुसऱ्या क्रमांकावर जाऊन उभ्या राहिल्या. नेहा शितोळे तिसऱ्या तर अभिजित बिचुकले चौथ्या स्थानावर जाऊन उभे राहिले. प्रत्येकाने आपण कोणता क्रमांक का निवडला आहे याचे स्पष्टीकरण द्यायचे होते. रुपाली भोसलेला सातव्या क्रमांकावर उभे रहावे लागल्याने तिने सगळा राग बिचुकलेंवर काढला. ते कसे खोटे बोलले, त्यांनी इतरांची फसवणूक कशी केली हे सांगायला सुरूवात केली. मात्र बिचुकलेंनी आरोप फेटाळले, ज्यानंतर रूपाली भोसलेने बिचुकलेंना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर तिळपापड झालेल्या बिचुकलेंनी रूपाली भोसलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिव्यांचा भडीमार करतानाच त्यांनी चौथा क्रमांक सोडला जो रूपाली भोसलेने पटकावला.

याच सगळ्या प्रकारावरून भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.