बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज ४३ वा वाढदिवस. ‘रेफ्यूजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला कलाविश्वामध्ये १८ वर्ष पूर्ण झाली. या करिअरच्या काळात अभिषेकचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे गाजले. मात्र काही चित्रपटांनी सरासरी कमाई केली. मात्र सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातून त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक साऱ्यांना दाखवून दिली. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या या सुपरहिट चित्रपटांविषयी –

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिषेकचे बरेच चित्रपट फ्लॉप गेले. स्क्रिप्टवर लक्ष न देता चित्रपटात भूमिका स्विकारणं त्याला फार महागात पडलं. यामुळे त्याच्या ४ वर्षाच्या करिअरमध्ये एकापाठोपाठ १७ चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘धुम’ चित्रपटामुळे त्याच्या करिअरच्या आलेखाला दिशा मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर एका पाठोपाठ एक करत त्याचे ८ चित्रपट सुपरहिट ठरले.

‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘ब्लफमास्टर’, ‘गुरू’ आणि दोस्ताना यासारखे दमदार चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. त्यानंतर अभिनेता अमिताभ बच्चनसोबत पा चित्रपटात झळकण्याची त्याला संधी मिळाली. या चित्रपटामध्ये त्याने बिग बींच्या वडीलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता.