बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

नुकताच ‘द बिग बुल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ३ मिनिट ८ सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘इस देश मैं हम कुछ भी कर सकते है’ असे बोलताना दिसत आहे. चित्रपटातील अभिषेकचा हटके अंदाज आणि लूकवर चाहते फिदा झाले आहेत. तसेच चित्रपटात इलियाना डिक्रूज एका महिला पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये हर्षद मेहता यांचा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण ते भारतातील सर्वात मोठा स्टॉक इन्व्हेस्टर होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्याच आला आहे.

येत्या ८ एप्रिलला ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली. त्यामुळे चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे