हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही नावाजलेल्या चित्रपटांमध्ये शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटाची गणना होते. या महिन्यात या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या अभिषेक बच्चन याला या चित्रपटातील त्याच्या आवडत्या प्रसंगाबद्दल विचारले असता, आपण या चित्रपटाच्या मेकिंगच्याच अधिक प्रेमात असल्याचे त्याने सांगितले.
काही चित्रपट असे असतात, जे कितीही जुने झाले तरी लोकांच्या मनातून त्यांची मोहिनी जात नाही. अशाच काही चित्रपटांमध्ये शाहरुख आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटाची गणना होते. त्यातील गाजलेली गाणी असोत, शाहरुख-काजोल यांची जोडी किंवा शाहरुख आणि अमरिश पुरी यांची जुगलबंदी असो; प्रेक्षक या साऱ्याच्या प्रेमात पडले होते. चित्रपटातील कित्येक प्रसंग आजही लोकांच्या मनात बिंबलेले आहेत.
आगामी ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुख खान आणि चित्रपटातील इतर कलाकार एका कार्यक्रमाला गेले असता ‘दिलवाले दुल्हनियाँ..’ या चित्रपटाचा विषय निघाला आणि त्यातील त्यांच्या आवडत्या प्रसंगाबद्दल पत्रकारांनी छेडले होते.
या वेळी अभिषेक बच्चन म्हणाला की, ‘हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मी महाविद्यालयात होतो. त्या काळी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य चोप्राचा आम्हाला दरारा वाटत असे. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्याने आम्हाला चित्रपटाच्या मेकिंगची व्हीसीआर दिली होती. ती व्हीसीआर मी आणि माझी बहीण श्वेता दिवसातून चार ते पाच वेळा पाहत असू. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी तो चित्रपटगृहात कितीदा जाऊन पाहिला हे ठाऊक नाही, पण त्या काळी चित्रपटापेक्षा मी त्याच्या मेकिंगच्या प्रेमात जास्त होतो.’
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित शाहरुखने त्याला अमरिश पुरी आणि त्याच्यावर चित्रित झालेला कबुतरांना दाणे देण्याचा प्रसंग आपल्याला सगळ्यात जास्त भावल्याचे सांगितले.