करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणे सुरू केले आहे. लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विट केले होते. पण त्याला या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकल्यावर अभिषेकने आनंदी होऊन ट्विट केले. ‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले असून आनंदी असल्याचे इमोजी वापरले होते.

अभिषेकचे हे ट्विट पाहून ट्रोलर्सने त्याला ट्रोल केले आहे. एका यूजरने ‘पण तरीसुद्धा तुला असं नाही वाटत का तू बेरोजगार राहणार आहेस?’ असे म्हणत ट्रोल केले होते. त्या यूजरला अभिषेकने उत्तर दिले आहे. त्याने उत्तर देत ‘ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला आमचे पुढचे काम मिळणार नाही. त्यामुळे आम्ही १०० टक्के देऊन काम करत असतो आणि चांगलच होईल यासाठी प्रार्थना करतो’ असे अभिषेकने म्हटले.

अनलॉक ५:
अनलॉक ४चा टप्पा संपल्यानंतर केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्याची घोषणा केली आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारनं चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारनं अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ५० टक्के शिक्षकांना शाळेत बोलवण्यास परवानगी दिली होती. पाचव्या टप्प्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असं मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारं सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासही केंद्रानं संमती दिली आहे. मात्र, अशा कार्यक्रमांना १०० व्यक्तीची मर्यादा घालण्यात आलेली आहे. सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना केंद्रानं अगोदरच परवानगी दिली आहे. मात्र, हे कार्यक्रम कंटेनमेंट झोनमध्ये आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.