बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्याला ओळख मिळवून दिली. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या दोन्ही कलाकारांनी पदार्पण केलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक बॉलिवूडमधील फ्लॉप अभिनेता होता. हे किती जणांना माहिती आहे? चला जाणून घेऊया त्या दिग्दर्शकाबद्दल…

‘काइ पो चे’ आणि ‘केदारनाथ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे. आज ६ ऑगस्ट रोजी अभिषेकचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. अभिषेकने आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अभिषेकच्या फितूर, रॉक ऑन या दोन चित्रपटांनी देखील चांगली कमाई केली होती. अभिषेक हा एकता कपूर आणि तुषार कपूरचा चुलत भाऊ असल्याचे म्हटले जाते.

अभिषेकने करिअरची सुरुवात ही एक अभिनेता म्हणून केली होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिक मस्ताने चित्रपटात अभिषेकने एक भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने १९९७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उफ ये मोहब्बत’ आणि २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिखर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर त्याने अभिनय सोडून रायटर आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज तो बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.