कमल हसनच्या इंडियन 2 या सिनेमाचं काम सुरू झालं असलं तरी खलनायक कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. या भव्य प्रकल्पात काम करण्यासाठी दिग्दर्शक शंकर यांनी अजय देवगण व अक्षय कुमारशी बोलणी केल्याची चर्चा होती. तसेच अक्षय कुमारचं खलनायकाची भूमिका साकारेल असा जाणकारांचा होरा होता. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार चक्क अभिषेक बच्चननं बाजी मारली असून इंडियन 2 चा तो खलनायक असेल. या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत आहे व लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या संदर्भात अजून अधिकृत घोषणा करणार आली नसली तरी इंडियन 2 या चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक तामिऴ सिनेमात पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे.

कमल हसन व अमिताभ बच्चन यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असल्यामुळे आता कमल हसन व अभिषेक यांची केमिस्ट्री कशी होते याकडे सगळ्याचं लक्ष असेल. इंडियन 2 च्या पोस्टरमध्ये वृद्ध, परंतु अनुभवी व कठोर अशा सेनापतीच्या रुपात कमल हसनचं दर्शन झालेलं आहे. ही भूमिका करण्यास अजय देवगण उत्सुक होता, परंतु अत्यंत व्यस्त शेड्युलमुळे त्याला हा चित्रपट स्वीकारता आला नाही. रजनीकांत सोबत 2.0 साकारलेला व शंकरसोबत काम केलेल्या अक्षय कुमारच्या नावाची चर्चा झाली. परंतु तोही अत्यंत व्यस्त असल्यामुळे त्याचा समावेश बारगळल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कमल हसनचा हा शेवटचा चित्रपट असेल. राजकीय पटलावर कमल हसन यांनी पदार्पण केलं असून इंडियन टू नंतर चित्रपटसृष्टीला कमल हसन राम राम ठोकणार आहेत. त्यामुळेही या भव्य चित्रपटाबद्दल केवळ तामिळच नाही तर समस्त भारतीय सिनेरसिकांना उत्सुकता आहे.