‘तू तिथं मी’ या मालिकेतील ‘दादा होळकर’ या भूमिकेद्वारे अमाप लोकप्रियता मिळालेले अभिनेते मिलिंद शिंदे आता लेखकाच्या आणि अभिनेत्याच्या भूमिकेत रंगभूमीवर पाहायला मिळणार आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर ‘अबीर गुलाल’ या नाटकाच्या माध्यमातून शिंदे हे लेखक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत असून याच नाटकात ते अभिनयही करणार आहेत.

तृप्ती प्रॉडक्शन बॅनरतर्फे निर्माते अशोक शिगवण यांनी हे नाटक सादर केले असून दिग्दर्शन मंगेश सातपुते यांनी केले आहे. ६ नोव्हेंबर रोजी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. अस्तीत्ववादासाठी झगडणाऱ्या, आत्मकेंद्री आणि अप्पलपोटय़ा वृत्तीवर या नाटकात प्रकाश टाकण्यात आला आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा कोणत्याही क्षेत्रात अस्तित्ववादासाठी माणूस नैतिकता किंवा अनैकता याचा विचार न करता कुठल्याही थराला जाऊ शकतो. हे त्याला कधी त्याच्या इच्छेने तर कधी अनिच्छेने करावे लागते. या सगळ्यात त्याची जी ससेहोलपट होते, ती ‘अबीर गुलाल’मध्ये मांडण्यात आली आहे. नाटकात मिलिंद शिंदे यांच्यासह पल्लवी वाघ-केळकर, अरुण मोहरे, मनिषा चव्हाण, रमेश रोकडे, ओंकार पनवेलकर आणि अन्य कलाकार आहेत. गोटय़ा सावंत सूत्रधार म्हणून काम पाहात आहेत.