‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि हृतिकच्या आयुष्यातही बँग बँग घटना एकापाठोपाठ एक घडत गेल्या. मुळात याच चित्रपटाच्या सेटवर मेंदूला दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेआधी हृतिकच्या हातात ‘बँग बँग’, शेखर     क पूर दिग्दर्शित ‘पानी’ आणि करण जोहरची निर्मिती असलेला ‘शुद्धी’ असे तीन चित्रपट होते. ‘क्रिश ३’ प्रदर्शनासाठी तयार होता. त्यामुळे बरं झाल्यानंतर हृतिकने रखडलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्राधान्य दिलं. त्यानंतर घटना इतक्या वेगाने घडत गेल्या.. ‘क्रिश ३’चं यश ही एकमेव सुखद घटना वगळली तर पत्नी सुझ्ॉनचा घटस्फोटाचा निर्णय, ‘पानी’ आणि ‘शुद्धी’ दोन्ही चित्रपटांवर सोडावं लागलेलं पाणी..आत्तापर्यंतचं त्याच्याबद्दल असलेलं ‘सुखद’ चित्र पार काळवंडून गेलं होतं. ‘पानी’बद्दल बोलताना शेखर कपूर यांनी म्हटलं होतं, की ज्या हृतिकला डोळ्यांसमोर ठेवून मी पटकथा लिहिली होती तो आत्ताचा हृतिक नाही. तो फार बदलला आहे. ‘बँग बँग’च्या निमित्ताने मुलाखत देणाऱ्या हृतिकला ऐकल्यानंतर तोंडात साखरेची गोळी घोळत असल्यागत गोड बोलणारा ‘तो’ परिस्थितीमुळे बदलतो आहे की त्याच्यामुळे परिस्थिती बदलली आहे हे कळणं कठीण आहे. मात्र ‘बँग बँग’मुळे बॉलीवूडचा खरा ‘हिरो’ पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये आला आहे याबद्दल शंका नाही.
‘बँग बँग’ एवढा थकायला लावेल असं वाटलं नव्हतं..
‘क्रिश ३’नंतर काहीतरी हलकंफुलकं करायची कल्पना होती. फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना ‘नाइट अ‍ॅण्ड डे’ हा चित्रपट पाहिला. तेव्हा मी स्वत:शी असं म्हणालो होतो की मला असा चित्रपट करायचा आहे. एकदम धम्माल, अ‍ॅक्शन आहे, थोडी गंमत आहे. आणि ‘धूम २’नंतर मी असा चित्रपट के लेलाच नव्हता. त्यानंतर बरोबर महिन्याभराने मला सिद्धार्थचा फोन आला आणि त्याने म्हटलं की मला एक चित्रपट करायचा आहे आणि तो ‘नाइट अ‍ॅण्ड डे’चा रिमेक आहे. ‘नाइट अ‍ॅण्ड डे’चा उल्लेख ऐकताच मी त्याला अरे, मीही हाच विचार करत होतो.. असं उत्तर दिलं. या अशा योगायोगातून ‘बँग बँग’ जुळून आला, असं हृतिकने सांगितलं. म्हणजे खरं तर या चित्रपटासाठी अवघ्या पाच सेकंदांत आपण होकार दिला. मात्र प्रत्यक्षात सहा-सात महिने पटकथेवर काम केल्यानंतर ती मनासारखी झाल्यानंतर चित्रपटासाठी करारबद्ध झाल्याचं हृतिकने सांगितलं. मी माझ्या वडिलांच्या चित्रपटांवर जसं पटकथेपासूनच काम करतो तसंच याही चित्रपटाच्या पटकथेवर काम केलं आहे. म्हणूनच, हा चित्रपट ‘नाइट अ‍ॅण्ड डे’पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे हे तुमच्या लक्षात येईल. चित्रपटाची मूळ संकल्पना नक्कीच ‘नाइट अ‍ॅण्ड डे’वरून प्रेरित आहे. मात्र रिमेक जसाच्या तसा नाही. त्यामुळेच असेल, पण सुरुवातीला ‘बँग बँग’ तेवढा अ‍ॅक्शनपॅड वगैरे असेल असं वाटलं नव्हतं. पण चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्यातली ‘अ‍ॅक्शन’ वाढत वाढतच गेली, असे तो म्हणतो.
पंधरा र्वष अ‍ॅक्शनपट केल्यानंतर अवघड काही उरतच नाही..
पंधरा र्वष अ‍ॅक्शनपट केल्यानंतर काही अवघड असं उरतच नाही. तुमची अ‍ॅक्शनदृश्ये देण्याची एक पद्धत, एक साचा ठरून गेलेला असतो. तुम्हाला माहिती असतं की अमुक एक स्टंट करणं आव्हानात्मक आहे, थोडंसं अवघड आहे. पण सरावाने त्यावर कशी मात करायची हे तुम्हाला माहिती असतं. आणि प्रत्येक सरावानंतर तुम्ही आणखी सफाईदार बनत जाता. खरं अवघड काय असतं तर ती तुमच्या मनाची तयारी. कारण एका प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला उडी मारायची आहे आणि ते करत असताना खाली काहीही नाही. वर फक्त तुम्हाला धरून ठेवणारी ती एक दोरी आहे.. ही जी भीती असते मनातली त्यावर विजय मिळवणं हे आव्हान असतं. आणि त्या भीतीवर मात करायला मला खूप आवडतं.
स्टाइलबद्दल मला फार काही कळत नाही
‘स्टाइल आयकॉन’ म्हणून ओळखला जाणारा हृतिक मला स्टाइलबद्दल फार काही कळत नाही, असं म्हणतो. त्याच्या मते, तुम्ही जे कपडे घालता त्यातून तुम्हाला आरामदायी वाटत असेल, जर तुम्हाला त्यातून छान ऊर्जा मिळत असेल. आणि ते पाहून लोकांनाही तसा पेहराव करण्याइतकं छान वाटत असेल तर ती माझी स्टाइल आहे. स्टाइल म्हणजे चांगला चेहरा, सरळ नाक असं काही नसतं. चित्रपटात महत्त्वाचे असतात ते तुमचे हावभाव. तुमच्या चेहऱ्याकडे बघून समोरच्याला आनंद वाटत असेल तर ती तुमची खरी स्टाइल आहे, असं तो सांगतो.
स्वत:ची रडकथा आळवायला आवडत नाही.
सुझ्ॉनशी वेगळं झाल्यानंतर आयुष्य अवघड झालं आहे का? असं विचारायची तो संधी देत नाही. आत्ताचं आयुष्य हे वेगळं आहे आणि अवघडही आहे हे तो स्वत:हूनच कबूल करतो. दु:ख प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. तुम्ही स्वत:पेक्षा इतरांकडे बघा. तुम्हाला लक्षात येईल प्रत्येकाकडेच दु:खभरी कहाणी आहे. आपल्याला असं वाटत असतं की माझ्याच आयुष्यात किती दु:ख आहे, मलाच किती भोगावं लागतंय.. आपल्या रडकथेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण इतरांच्या दु:खाकडे बघून त्याच्यासाठी काय करू शकतो, असा विचार केला पाहिजे. आपण प्रत्येकाने असा विचार केला तर हे आयुष्य, हे जग किती सुंदर आहे याची प्रचीती येईल. तुम्ही दु:खातही तुमचं आनंदवन बनवू शकता, तुमच्याभोवती असणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुम्ही भाग होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या रडकथेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मी ते करतो.