Sanju : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट महिन्याअखेरीस प्रदर्शित होत आहे. पण, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडण्याची शक्यता आहे कारण संजू चित्रपटातील एका दृश्यावर सामाजिक कार्यकर्ते पृथ्वी म्हस्के यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे याबद्दल तक्रार केली असून तुरुंगातील एका दृश्यावर सेन्सार बोर्डानं कात्री लावावी असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

#Sanju : अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडताना ‘संजू’

गेल्याच महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यात कारागृहातील एक दृश्य दाखवण्यात आलं आहे. संजय दत्तला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीत मैला वाहून आला असल्याचं दाखवलं होतं. या दृश्यावर सामाजिक कार्यकर्ते म्हस्के यांनी आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, चित्रपटाचे निर्माते आणि रणबीर कपूर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. ‘संजय दत्त यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतील शौचालयातून मैला वाहून आल्याचं दाखवलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे सरकार आणि करागृहातील प्रशासन करागृहाची योग्य ती काळजी घेतात. अशा प्रकारची घटना करागृहात घडल्याचं आमच्या ऐकिवात नाही. आतापर्यंत बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटात कारागृह दाखवण्यात आले आहेत पण असा प्रकार कुठेही दाखवण्यात आला नव्हता.’ असं म्हस्के यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

‘काहीही केलंस तरी तू संजू होऊ शकत नाही’- अर्शद वारसी

‘या दृश्यामुळे कारगृह, कारागृह प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. जर या दृश्यावर कात्री लावण्यात आली नाही तर मात्र कोर्टात जाऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी आम्हाला करावी लागेल’ असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. संजू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही खूपच उत्सुक आहेत. २९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रणबीरसह परेश रावल, सोमन कपूर, विकी कौशल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका या चित्रपटात आहे.